निंभोरा पोलिसांकडून सोशल मीडियावर फसवेगिरीसह अफवा थांबविण्यासाठी जनजागृती


खिर्डी : झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तरुणाईला ठगवण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. दिलेले टास्क पूर्ण करण्यास सांगून गंडवणे, शेअर बाजारात अधिक परताव्याच्या आमिषाने अथवा एखाद्या लिंकवर क्लीक करण्यास सांगून गंडवणे, फेसबुकवर आधी ओळख निर्माण करून नंतर व्हिडिओ कॉलद्वारे खंडणी मागण्याचे वाढलेले प्रकार पाहता निंभोरा पोलिसांनी त्या संदर्भात सोशल मिडीयातून जनजागृती सुरू केली आहे.

ऑनलाईन व्यवहार करताना सतर्कतेचे आवाहन
खोट्या कर्ज योजनांना बळी पडू नका तसेच ऑनलाईन कर्ज देणार्‍या फसव्या कर्ज योजनांपासून सावध रहा, जीएसटी किंवा प्रोसेसिंग फीच्या नावाने आगाऊ पैसे देवू नका आदी प्रकारचे आवाहन तरुणाईला केले जात आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातूनच सर्वात जास्त फसवेगिरीच्या घटना घडत असल्याने निंभोरा पोलिसांनी सोशल मिडीयातूनच तरुणाईला सतर्क व सावध राहण्याचे आवाहन केले आहे. सोशल मिडीयाचा वापर तरुणाईने गरजेपुरता करावा, आपला पासवर्ड सुरक्षित राहिल याची काळजी घ्यावी, अनोळखी लिंकला क्लीक करू नये तसेच फसव्या व आमिष दाखवणार्‍या योजनांपासून लांब रहावे, असे आवाहन निंभोरा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीदास बोचरे यांनी केले आहे.

पोलिसांची सोशल मीडियावर नजर
जळगाव जिल्हा पोलिस दलाने सोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळण्याचं आवाहन केले आहे. पोलिस सर्व परीस्थिती हाताळण्यास सक्षम असून सायबर पोलिस टीम तंत्रज्ञान आणि विशेष दलाच्या साहाय्याने सर्व सोशल मीडिया साईटवर बारकाईने लक्ष ठेवून असून भावना दुखावणारा वा तेढ टाकणारा मजकूर टाकणार्‍यांविरोधात धडक कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक निरीक्षक बोचरे यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !