अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर पकडताच धावत्या वहनातून चालकाने मारली उडी : यावलला तलाठ्याच्या समय सुचकतेने अनर्थ टळला
यावल : चोपड्याकडून शहरात दाखल होणारे अवध वाळू वाहतूकीचे डंपर तहसीलदार व त्यांच्या पथकाने पकडले. कारवाईदरम्यान चालते डंपर सोडून चालकाने उडी घेत पळ काढला. भालोद तलाठी यांनी जीवाची पर्वा न करता समय सुचकता दाखवत डंपरमध्ये चालकाच्या सिटवर जावून त्यावर नियंत्रण मिळवले व मोठी दुर्घटना टळली. हा थरार शनिवारी पहाटेपूर्वी घडला. डंपर जप्त करीत तहसील कार्यालयात लावून मालकास दंडाची नोटीस बजावण्यात आली.
अवैध वाळू वाहतूक ऐरणीवर
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या स्वत:हा शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी सकाळपर्यंत गस्तीवर असताना शनिवारी पहाटेपूुर्वी चोपड्याकडून यावल शहरात डंपर (क्रमांक एम.एच 19 झेड.5912) हे येत होते. हतनूर कॉलनीजवळील शहरात दाखल होणार्या उतारावर तहसीलदार नाझीरकर व त्यांच्या पथकाने सदर डंपर पकडले. डंपर चालकास ते डंपर तहसील कार्यालयात घेऊन पथक निघाले. डंपरमध्ये फैजपूर तलाठी तेजस पाटील हे बसले होते. हडकाई नदीच्या पुलाजवळून डंपर जात असतांना डंपरवरील अज्ञात चालकाने चालू डंपर सोडून त्यातून खाली उडी मारली व तो पसार झाला. चालत्या डंपरमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता भालोद तलाठी भरत वानखेडे यांनी तात्काळ डंपरवर चढून डंपरला ब्रेक लावला व मोठी दुर्घटना टळली.


वेळीच डंपर नियंत्रीत झाले नसते तर अपघात होवून मोठी जीवित हानी घडली असती. डंपर तहसील कार्यालयात लावण्यात आला व मालक राहुल बाविस्कर (जळगाव) यास दंडाची नोटीस बजवण्यात आली. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सावखेडासीम मंडळ अधिकारी अतुल बडगुजर, भालोद मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, यावल तलाठी ईश्वर कोळी, भालोद तलाठी भरत वानखेडे, फैजपूर तलाठी तेजस पाटील, कठोरा येथील तलाठी वसीम तडवी, यावल येथील कोतवाल निलेश गायकवाड, कठोरा येथील कोतवाल विजय अडकमोल, विरावली येथील कोतवाल पंढरीनाथ अडकमोल यांच्या पथकाने केली.





