वढोदा गावाजवळ असलेल्या बेहेडे ऍग्रो टेक दुकानात चोरी
Theft at Behede Agro Tech shop near Wadhoda village यावल : यावल तालुक्यातील वढोदा येथील गावालगतच्या बेहडे ग्रोटेक दुकानातून मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी शटर व दरवाज्याचे कुलूप तोडून चोरी केली. चार क्विंटल कापूस, स्प्रे पंप व इतर साहित्य असा एकूण 47 हजाराचा मुद्देमाल लांबवण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरटयांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
47 हजारांच्या मुद्देमालावर डल्ला
वढोदा, ता.यावल गावाजवळ दीपक बेहडे (यावल) यांचे बेहडे ग्रोटेक दुकान आहे आणि जवळच शेतात गोडाऊन आहे. या ठिकाणी सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गोडाऊनचे शटरचे कुलूप तोडले तसेच दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. 24 हजार रुपये किंमतीचा चार क्विंटल कापूस, 20 हजार रुपये किमतीचे होंडा कंपनीचे शेत पिकास खत देणारा एक पंप आणि तीन हजार रुपये किंमतीचा एक फवारणी पंप असा एकूण 47 हजारांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार सकाळी निदर्शनात आला व चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेरयातदेखील कैद झाली. या प्रकरणी यावल पोलिसात दीपक बेहेडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पासपोळे, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


