कापूस खरेदीत मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्‍यांना जग्गू डॉनने घातला 52 लाखांचा गंडा

मलकापूर तालुक्यातील डॉनसह तिघांविरोधात गुन्हा : फसवणुकीचा आकडा 20 कोटींवर जाण्याची शक्यता ?


Jaggu Don cheated the farmers of Muktainagar taluka for buying cotton worth 52 lakhs भुसावळ : शेतकर्‍यांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कापसाला बाजारात सात हजारांचा भाव मिळत असताना खाजगी व्यापार्‍याने नऊ हजारांचा भाव देवू केल्याने शेतकरी जादा भावाच्या आमिषाने भाळले. मुक्ताईनगर तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांनी व्यापारी व एजंटांच्या भरवशावर लाखो क्विंटल कापूस मोजून दिला मात्र वर्षभरानंतरही रक्कम मिळाली नसल्याने व दिलेला धनादेश वटत नसल्याने शेतकर्‍यांनी मुक्ताईनगर पोलिसात धाव घेत फसवणूक झाल्याची कैफियत मांडली. याप्रकरणी मलकापूर तालुक्यातील जग्गू डॉन नामक खाजगी व्यापार्‍यासह तिघांविरोधात पाच शेतकर्‍यांची तब्बल 52 लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, सुरूवातीला पाच शेतकर्‍यांनी प्रातिनिधीक स्वरूपात तक्रार दिली असलीतरी फसवणुकीचा आकडा हा तब्बल 20 कोटींच्या घरात असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे.

शेकडो शेतकरी आमिषाला भाळले
2022-2023 मध्ये कापसाला बाजारात सात हजारांचा भाव दिला जात होता मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव व रूईखेडा परीसरात आलेल्या जगन्नाथ रामचंद्र नारखेडे उर्फ जग्गू डॉन, एजंट रामचंद्र खर्चे व गजानन खर्चे यांनी कापसाला नऊ हजारांचा भाव देण्याचे शेतकर्‍यांना आमिष दाखवले. बाजार भावापेक्षा तब्बल दोन हजार रुपये क्विंटलमागे भाव मिळत असल्याने ज्यादा रकमेला शेतकरी भाळले. शेतकर्‍यांचा व्यापार्‍यावर विश्वास बसावा म्हणून व्यापार्‍याने अनेक शेतकर्‍यांना धनादेशही देवून टाकले त्यामुळे आज ना उद्या रक्कम मिळेल या आशेने लाखो क्विंटल कापूस शेतकर्‍यांनी व्यापार्‍याला देवून टाकला.



व्यापारी नॉट रीचेबल : शेतकर्‍यांचा डोक्याला हात
वर्षभरानंतरही कापूस विक्रीची रक्कम मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी सातत्याने व्यापार्‍याशी संपर्क साधला मात्र व्यापारी नॉट रीचेबल असल्याने शेतकर्‍यांचे टेन्शन वाढले तर अनेकांना दिलेला धनादेशही वटत नसल्याने शेतकर्‍यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाणे गाठले. प्रातीनिधीक स्वरूपात अभय विष्णू पाटील (50, चांगदेव) या शेतकर्‍यासह अन्य पाच शेतकर्‍यांना साक्षीदार ठेवून व्यापारी जग्गू डॉन, एजंट रामचंद्र खर्चे व गजानन खर्चे (भालेगाव, ता.मकापूर) यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलिसात शनिवारी रात्री गन्हा दाखल करण्यात आला.

आता ‘डॉन’ का इंतजार : फसवणूक रक्कम 20 कोटींवर जाणार !
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकर्‍यांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या जग्गू डॉनला फसवणुकीच्या गुन्ह्यात मलकापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्याची माहिती आहे तर संशयित सध्या कारागृहात असून तेथून त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर मुक्ताईनगर पोलिस त्याला ताब्यात घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

जग्गू डॉनविरोधात 52 लाखांचा फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल झाला असलातरी प्रत्यक्षात शेकडो शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याने फसवणुकीचा आकडा सुमारे 20 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. हा गुन्हा लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी वर्तवली. तपास पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !