फेकरीतील तरुणाची आर्थिक वादातून हत्या : आरोपी बॉक्सरला दोन दिवसांची कोठडी
Fekhari youth killed due to financial dispute : Accused boxer jailed for two days भुसावळ : फेकरी, ता.भुसावळ येथील तरुणाची धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आल्याची घटना भुसावळ तालुक्यातील फेकरी शिवारात शनिवारी, 13 रोजी दुपारी घडली होती. या घटनेत भावेश अनिल भालेराव (25, भगवान साळवे नगर, फेकरी) या तरुणाचा मृत्यू ओढवला होता. खून प्रकरणी रोशन बबन हुसळे (28, फेकरी) या संशयिताला अटक करण्यात आली होती. संशयिताला रविवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, अटकेतील संशयित रोशन हा नॅशनल स्तरावरील बॉक्सींग पटू असून आर्थिक वादातून त्याने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे.
चाकूचे वार करीत केला खून : काही तासात आरोपी जाळ्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, मयत भावेश भालेराव व रोशन हुसळे यांच्यात पैशांचा वाद होता व पैशांवरून भावेश सातत्याने रोशनकडे तगादा लावत होता. शनिवारी दुपारीदेखील उभयतांमध्ये वाद झाला. यावेळी दगड व चाकूचे वार करीत भावेशचा खून करण्यात आला. खुनानंतर संशयित पसार झाला होता मात्र पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या पथकातील हवालदार सुरज पाटील यांनी संशयिताला निष्पन्न करीत कोपरगाव येथे पळून जाण्यापूर्वीच त्यास अटक केली. संशयिताला रविवारी भुसावळ न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप करीत आहेत.


