ऑनलाईन नऊ लाखांचा गंडा : कोलकत्त्यातील भामट्याला सायबर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Online scam of nine lakhs : Bhamtya shackled by cyber police for Kolkata जळगाव : टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणाची नऊ लाखांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी गौरव गौतम बर्मन (24, रा.राजरहाट, गोपालपूरा, कोलकाता) यास अटक करण्यात आली.
आठ लाख 75 हजारांची फसवणूक
जामनेर येथील चेतन कन्हैया फिरके (31) यांची आठ लाख 75 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. चेतन फिरके यांच्या व्हॉटस्अॅप व टेलिग्राम आयडीवर 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2023 या दरम्यान एका जणाने संपर्क साधत त्यांना टास्क देऊन तो पूर्ण करून त्यात गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा देण्याचे सांगितले. त्यासाठी या अनोळखीने फिरके यांच्याकडून वेळोवेळी एकूण आठ लाख 82 हजार रुपये स्वीकारले. त्यापैकी टास्क पूर्ण केल्याबद्दल भरलेल्या एकूण रकमेपैकी केवळ सहा हजार 825 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले. उर्वरीत नफा व मुद्दल रक्कम मात्र परत केली नाही.


बनावट पत्राद्वारे फसवणूक
फिरके यांना सांगितल्याप्रमाणे नफा व त्यांची रक्कम दिली नाही मात्र त्यांना एक बनावट पत्र दिले असून त्यावर विदेशातील एका स्टॉक एक्सचेंजचे नाव आहे. याबाबत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात 9 सप्टेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सायबर पोलिस कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यानुसार तपासात गौरव गौतम बर्मन (24, रा.राजरहाट, गोपालपूरा, कोलकाता) याने हा गुन्हा केल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी गौरव बर्मन याला अटक केली आहे. पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वसंत बेलदार, हवालदार हेमंत महाडिक, हवालदार मिलिंद जाधव यांनी परिश्रम घेतले.
