बारावी परीक्षा : भुसावळात इंग्रजी विषयासाठी तीन हजार 400 विद्यार्थी प्रवीष्ट
भुसावळ : उच्च माध्यमिक शालांत अर्धात इयत्ता बारावी परीक्षेला मंगळवारपासून सुरुवात होत आहे. शहरातील सहा परीक्षा केंद्रांवर तब्बल तीन हजार 426 परीक्षार्थी मंगळवारी इंग्रजीचा पहिला पेपर देतील. सकाळी 11 वाजेचा पेपर असला तरी विद्यार्थ्यांना किमान अर्धा तास आधी परीक्षाा केंद्रावर पोचणे अनिवार्य असेल, उशिरा येणार्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोबाइलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही.
अर्धा तास आधीच केंद्रावर येण्याची सूचना
मंगळवारी इंग्रजी विषयाचा पहिला पेपर 11 ते दुपारी 2 या वेळेत असेल. मात्र विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी अर्थात साडेदहा वाजताच परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे. उशिरा येणार्या परीक्षार्थींना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. भुसावळ शहरात कला, विज्ञान, वाणिज्य या शाखेचे तीन हजार 426 परीक्षार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट आहेत. यात के.नारखेडे विद्यालयात 437 नाहाटा महाविद्यालय केंद्रात 997, संत गाडगेबाबा विद्यालय 388, डी. एल. हिंदी विद्यालयात 837, बी. झेड उर्दू हायस्कूल केंद्रात 402, डी. एस. हायस्कूल केंद्रात 365 विद्यार्थी प्रवीष्ट आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी रागिनी चव्हाण या कस्टोडीयन म्हणून पदभार सांभाळणार आहेत तर के. नारखेडे विद्यालयात एन.बी.किरंगे, नाहाटा महाविद्यालय केंद्रावर शैलेश पाटील, संत गाडगेबाबा विद्यालय केंद्रावर सुधा शुक्ला, डी.एल.हिंदी विद्यालय केंद्रावर रामगोपाळ सहानी, बी.झेड उर्दू हायस्कूल केंद्रावर नूर तब्बसोम, डी.एस.हायस्कूल सुनील सोनार हे केंद्रसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. दरम्यान, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक केंद्रावर स्वतंत्र खोली असणार आहे.



