येवती परीसरातील 35 शेतकर्यांच्या शेतातून केबल वायर लांबवली
महिनाभरात दुसरी घटना : ऐन हंगामात शेतकर्यांवर संकट ; भूरट्या चोरट्यांचा व्हावा बंदोबस्त
Cable wire was extended from the fields of 35 farmers in Yevati area बोदवड : बोदवड तालुक्यातील येवती येथील शेतकरी विनोद दत्तात्रय शिंदे यांच्यासह अन्य 35 शेतकर्यांच्या शेतातील केबल वायर चोरट्यांनी लांबवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकर्यांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहे. महिनाभरानंतर दुसर्यांदा असा प्रकार घडला आहे. पोलिसांनी भूरट्या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मध्यरात्री झाल्या चोर्या
येवतीचे शेतकरी विनोद शिंदे यांचे गट क्रमांक 260/2/2/ब येथे शेत आहे. शेतातील कुंपणलिकेची सुमारे दोनशे फूट लांबीची केबल वायर चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्रीतून लांबवली. शेतकरी विनोद शिंदे हे सकाळी वीजपुरवठा असल्याकारणाने शेतात मोटर पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना आपली केबल वायर चोरीस गेल्याचा प्रकार लक्षात आला. त्यांनी आपल्या शेजारील शेतकर्यांची मोटर पंप व कुंपणलिका तपासली असता इतर 30 ते 35 शेतकर्यांची केबल वायर चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली.


या शेतकर्यांच्या शेतातून केबल लंपास
शेतकरी रामदास श्रावणे, सुधाकर माळी, राजू शिंदे, दत्तू धनगर, भागवत दांडगे, कृष्णा वाघ, उमेश वाघ, शिवाजी वाघ, मनोहर पाटील, बाळू पाटील, सतीश बावस्कर, शुभम पाटील, योगेश कांदेले, अशोक ठाकुर, तुळशीराम वानखेडे, भीमराव पाटील, विनोद शिंदे आदी शेतकर्यांची केबल चोरीस गेली.
