सावदा नगरपालिकेचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर
सावदा : सावदा नगरपालिकेने सन 2024-2025 या आर्थिक वर्षांचा सुमारे 66 कोटी 90 लाख 83 हजार 240 रुपयांचा व 10 लाख 13 हजार 80 रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सोमवार. 26 रोजी मंजूर केला. सलग दुसर्या वर्षी प्रशासक यांनी हा अर्थसंकल्प मंजूर केला. प्रभारी मुख्याधिकारी स्वालिहा मालेगावे यांचे मार्गदर्शनाखाली लेखापाल विशाल पाटील यांनी तयार केलेला हा अर्थसंकल्प उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक देवयानी यादव यांनी मंजूर केला.
असे येणार उत्पन्न
अर्थसंकल्पात महसुली जमा 14 कोटी 18 लाख 26 हजार इतकी दर्शविण्यात आली असून ही रक्कम पालिकेच्या विविध करांमधून तसेच उत्पनातून जमा होईल तसेच भांडवली जमा 46 कोटी 31 लाख 60 हजार इतकी दर्शविण्यात आली आहे. ही रक्कम विविध अनुदाने या माध्यमातून मिळेल. खर्चाच्या बाजूच्या महसुली खर्च यात कर्मचारी पगार वगैरे असे 18 कोटी 43 लाख 70 हजार 160 रुपये दर्शविण्यात आले. भांडवली खर्च 48 कोटी 37 लाख दर्शविण्यात आला आहे. यातून विविध विकास कामे करणे अंदाजित आहे. सर्व जमा व खर्च या बाबी मिळणारे अनुदाने यावर अवलंबून अंदाजित खर्च दर्शविण्यात आला आहे.


विविध विकासकामांसाठी तरतूदी
यंदाच्या अर्थसंकल्पात शहरातील विविध विकासकामांसाठी तरतुदी करण्यात आल्या. त्यात शहराची सर्वात मोठी महत्वाकांक्षी योजना असलेल्या अमृत 2.0 योजनेसाठी सर्वात जास्त 18 कोटी रुपयांची तरतूद यात करण्यात आली. याचबरोबर वैशिष्ट्ययपूर्ण कामे दोन कोटी, विशेष रस्ता अनुदान दोन कोटी, हद्दवाढ योजना दोन कोटी, रस्ते बनविणे एक कोटी, नागरोथ्थान योजना दोन कोटी, दलितेतर योजना 50 लाख अश्या विकास कामांसाठी तरतुदी करण्यात आल्या. सोबत पथदिवे, सफाई, स्वच्छ भारत अभियान यासह आणखीन विविध कामांसाठी देखील खर्चाच्या तरतुदी यात करण्यात आल्या. दरम्यान यंदा चतुर्थ कर आकरणीतील वाढ वगळता कोणतीही करवाढ यात करण्यात आलेली नाही. या अर्थसंकल्पात भांडवली खर्चावर भर देण्यात आला असून नगर पालिका उत्पन्न वाढीवर भर देण्यात आला आहे.






