भुसावळात बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनमध्ये धावल्या 475 रणरागिणी
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचा उप्रकम : शहर झाले गुलाबी
475 female warriors ran in Bisara Ladies Equality Run in Bhusawal भुसावळ : भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशन आयोजित बिसारा लेडीज इक्वॅलिटी रनचे रविवार, 3 मार्च रोजी आयोजन करण्यात आले. महिला दिनानिमित्त आयोजित या स्पर्धेत तीन किमी अंतरात 280, पाच किलोमीटर अंतरात 153 तर 10 किलोमीटर अंतरात 42 महिला धावपटू मिळून 475 महिलांनी यशस्वी सहभाग नोंदविला. भुसावळ शहरासोबतच जळगाव, बुलढाणा, पुणे, नाशिक व अमरावती येथील महिलांनी देखील या रनमध्ये सहभाग नोंदविला होता.
यांची प्रमुख उपस्थिती
स्पर्धेला शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानापासून स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर जामनेर रोडवरील नाहाटा कॉलेज चौकातून पुन्हा वळसा घेऊन त्याच रस्त्याने परत डी.एस.ग्राउंड व पुढे आरपीडी रोडवरील लिंपस क्लब व तिथून पुन्हा परत येऊन कोरोनेशन क्लब असा हा स्पर्धेचा मार्ग होता. सुरुवातीस कौस्तुभ मंत्री यांनी वॉर्म अप घेतला. त्यानंतर 10 किमीची स्पर्धा सकाळी सहा वाजता, पाच किलोमीटर अंतराची स्पर्धा सकाळी सहा वाजून 10 मिनिटांनी तर तीन किलोमीटर अंतराची स्पर्धा ठिक सकाळी सहा वाजून 20 मिनिटांनी सुरू झाली. यावेळी रनला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी या रनच्या सदिच्छादूत डॉ.रती महाजन, माय फिटनेस जिम व हॉटेल मल्हारच्या संचालिका किर्ती धनगर, डॉ.तुषार पाटील, उमेश घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.


धावपटूंवर केली पुष्पवृष्टी
क्रीडांगणावर व्यवस्था केलेल्या वेगवेगळ्या सेल्फी पॉईंटजवळ महिला एकेरी तसेच आपल्या समूहासोबत, आपल्या मैत्रिणींसोबत व नातेवाईकांसोबत ग्रुप फोटो देखील घेत होत्या व आनंद व्यक्त करीत होत्या. याशिवाय शहरातील रस्त्यावरील विविध ठिकाणी भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनचे असंख्य धावपटू, सायकलपटू व जलतरणपटू स्वयंसेवकाच्या भूमिकेत होते. ते धावणार्या महिलांचा उत्साह द्विगुणीत करीत होते व त्याचबरोबर रहदारीचे देखील नियमन करत होते. धावण्याच्या मार्गावर स्वयंसेवकांतर्फे विविध ठिकाणी धावणार्या महिलांवर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली.
स्पर्धकांचा बक्षिसांनी गौरव
व्यासपीठावर बढे कॅपिटल्सचे संचालक ज्ञानेश्वर बढे, माय फिटनेस जिमचे संचालक प्रमोद धनगर, संजय कुकरेजा, डॉ.तुषार पाटील, डॉ.रती महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम पाच किमी अंतरातील विजयी स्पर्धकांचा त्यानंतर 10 किमीतील विजेत्या महिलांना गौरविण्यात आले. त्याचबरोबर लकी ड्रॉद्वारे काही निवडक भाग्यवान महिलांना देखील विविध बक्षिसे देण्यात आली. मान्यवरांचे स्वागत डॉ.निलिमा नेहेते व डॉ.चारुलता पाटील यांनी केले. आभार प्रवीण पाटील यांनी मानले. रनदरम्यान रूट सपोर्टसाठी प्रवीण फालक व ब्रिजेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवकांनी आपली भूमिका चोख बजावली.
स्पर्धेतील विजेते असे- पाच किलोमीटर : जान्हवी रोझोदे (प्रथम), उज्वला बारी (द्वितीय) तर रीधीमा चौधरी (तृतीय), दहा किलोमीटर- अश्विनी मोरे (प्रथम), वैशाली कोळी (द्वितीय) तर सीमा पाटील (तृतीय) तसेच लकी ड्रॉ: भारती चव्हाण व प्रतिभा कोकांदे.
