पुण्यातील खुनासह मोक्काच्या गुन्ह्यात फरार आरोपी जाळ्यात : चार कट्टे व दहा जिवंत काडतूस जप्त : चाळीसगावातील कारवाईने जिल्ह्यात खळबळ
Accused absconding in Pune murder and Mokka crime in net : Four knives and ten live cartridges seized: Action in Chalisgaon stirs up excitement in the district चाळीसगाव : चाळीसगाव शहर पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान पुण्यातील खुनासह मोक्काच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला अटक केली आहे. संशयिताच्या ताब्यातून चार गावठी कट्टे व दहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आमीर आसीर खान (20, काकडे वस्ती, कोंढवा, पुणे) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे तर त्याचा साथीदार आदित्य भोईनल्लू (पुणे) पसार झाला आहे. ही कारवाई रविवार, 10 मार्च रोजी नाकाबंदी दरम्यान करण्यात आली.
नाकाबंदीदरम्यान आवळल्या मुसक्या
चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे रोड, तेजस कॉर्नरकडे जाणार्या रस्त्यावर नाकाबंदी लावण्यात आली. 10 रोजी नाकाबंदी दरम्यान धुळ्याकडून दुचाकी (एम.एच.12 व्ही.एक्स. 3008) वरून चाळीसगावचे दिशेने दोघे येत असताना पाठीमागे बसलेल्या एकाने दुचाकीवरून उडी टाकत पळ काढला तर दुसर्या संशयिताला पोलिसांनी पकडल्यानंतर त्यास नाव विचारल्यानंतर त्याने आपले नाव आमीर आसीर खान (20, रा.काकडे वस्ती, कोढंवा, पुणे) सांगत साथीदाराचे नाव आदित्य भोईनल्ल (रा.पुणे) सांगितले तर संशयिताच्या झडतीत बॅगेत चार गावठी बनावटीचे पिस्टल, पाच मॅगेझिन तसेच दहा जिवंत काडतूस आढळले. संशयितांविरोधात पवन पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला.


आरोपी पुण्यातून तडीपार
अटकेतील आरोपी आमीर आसीर खान हा शरीराविरुध्द गंभीर गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनला गुरनं. 218/2023 भादवि कलम 302, 307 सह सघंटीत गुन्हेगारी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल आहे शिवाय संशयित सहा महिन्यांपासून फरार असल्याचे समोर आले. संशयितांविरोधात एकूण सहा गंभीर गुन्हे दाखल असून पुणे जिल्ह्यातून त्याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. आरोपीचा साथीदार आदित्य भोईनल्लु याचा कसून शोध सुरू आहे. आरोपीने एव्हढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा कोठून आणला? व त्यांनी काही घातपाती कारवाया करण्याचा कट रचला आहे काय ? याबाबत पोलिसांकडून अत्यंत बारकाईने तपास सुरू आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चाळीसगाव विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहा.अपर पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख, चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक सागर एस.ढिकले, पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश माळी, राहुल सोनवणे, महेंद्र पाटील, पवन पाटील, मनोज चव्हाण, आशुतोष सोनवणे, रवींद्र बच्छे, ज्ञानेश्वर गीते, ज्ञानेश्वर पाटोळे, नंदकिशोर महाजन, समाधान पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहा आव्हाड, प्रकाश पाटील, उज्चलकुमार म्हरके करीत आहेत.