भुसावळात चिमुकल्याच्या मृत्यूनंतर खडका रोडवर पालिकेकडून स्वच्छतेला सुरूवात
खेळताना चिमुकला पडला नालीत : प्रशासनाविरोधात नागरिकांचा तीव्र संताप
After the death of a child in Bhusawal, the municipality has started cleaning on Khadka Road भुसावळ : तीन वर्षीय बालक खेळत असताना अचानक नाल्यात पडून मृत झाल्याची घटना रविवारी रात्री आठ वाजता उघडकीस आली होती. या घटनेनंतर पालिका प्रशासनाविरोधात मोठा रोष उफळला होता. या अनुषंगाने पालिकेने या भागातील नाल्यांची स्वच्छता सुरू केली आहे. दरम्यान, यापूर्वीही खोल नाल्यांमुळे अप्रिय घटना घडल्यानंतरही पालिकेकडून कुठल्याही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने जनक्षोभ वाढला आहे.
खेळताना चिमुकला पडला नालीत
अरसलान उर्फ बाबू बिहारी (3) हा चिमुकला आपले वडील नसरूद्दीन बिहारी यांच्यासह बिलाल कांडप केंद्राजवळील दुकानावर रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास आला होता. वडिल कामात असताना चिमुकला खेळत होता व खेळताना तो खोल नाल्यात (गटार) पडला. तासाभरानंतरही मुलगा दिसत नसल्याने पित्याची चिंता वाढली व त्यांनी मुलाचा शोध सुरू केला तर सोशल मिडीयावरही चिमुकला हरवल्याची पोस्ट व्हायरल करण्यात आली. एव्हाना सायंकाळ झाली मात्र चिमुकल्याचा पत्ता लागत नसल्याने पालकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. चिमुकल्याच्या शोधासाठी माजी नगरसेवक आशिक खान शेर खान यांच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर चिमुकला खेळताना नाल्यात पडल्याचे लक्षात आल्यानंतर 30 फूट नाल्यात उतरून बालकाला बाहेर काढण्यात आले मात्र तो पर्यंत उशीर झाला होता.



मध्यरात्री दफनविधी
मध्यरात्रीच्या सुमारास मयत अरसलान उर्फ बाबू बिहारी (3) या बालकावर शोकाकुल वातावरणात दफनविधी करण्यात आला. यावेळी आई-वडिलांनी केलेला आक्रोश मन हेलावणारा होता. मयत बालकाच्या पश्चात आई, वडिल, तीन भाऊ असा परिवार आहे. मयत बालकाचे वडील नसरुद्दीन हे बिर्याणी कारागीर असून भाडे तत्वावरील घरात या कुटूंबाचे वास्तव्य आहे.
पालिकेकडून नाल्यांची सफाई
चिमुकल्याचा नाल्यात पडल्याने झालेल्या मृत्यूनंतर पालिकेने सोमवारी सकाळपासून या भागातील नाल्यांच्या सफाईला वेग दिला आहे. अनेकदा या नाल्यांमुळे अप्रिय घटना होत असल्यातरी पालिकेकडून ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरीकामंध्ये पालिका प्रशासनाविषयी प्रचंड रोष आहे. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या सूचनेनंतर सफाई विभागासह आरोग्य विभागाच्या नेतृत्वात या भागातील नाल्यांची स्वच्छता करण्यात येत आहे. नियत या भागातील गटारींची स्वच्छता करावी, अशी अपेक्षा नागरीकांमधून व्यक्त होत आहे.
नाल्यावरील अतिक्रमण काढावे : मुख्याधिकारी
खडका रोडवरील अनेक नाल्यांवर व्यावसायीकांनी अतिक्रमण केल्याने नाल्यांची स्वच्छता करण्यास अडचण होते. व्यावसायीकांनी स्वतःहूनच हे अतिक्रमण हटवण्याची आवश्यकता आहे शिवाय नाल्यांमध्ये कुठलाही काडी-कचरा वा घाण न टाकण्याची जवाबदारी नागरीकांची आहे. या भागात नियमित घंटागाडी सुरू केल्याने घंटागाडीतच कचरा टाकावा, असे आवाहन मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी केले.





