सातगाव डोंगरी येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून
A young man was killed in a petty dispute in Satgaon Dongri पाचोरा : पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी येथे जुन्या वादातून तरुणाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवार, 10 मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडल्याने गावात मोठी खळबळ उडाली. पोपट ओंकार राठोड (22, सातगाव डोंगरी) असे मयताचे नाव असून याप्रकरणी राहुल अभिमान आल्हाड (25, सातगाव डोंगरी, ता.पाचोरा) या संशयिताविरोधात पिंपळगाव हरेश्वर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
जमिनीवर आपटल्याने तरुणाचा मृत्यू
समजलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या वादातून संशयित राहुल आल्हाड याने पोपट राठोड या तरुणाच्या डोक्याला दोन वेळा हातातील कड्याने मारहाण केली तसेच आज तुला जिवंत सोडणार नाही म्हणून जमिनीवर जोरदार आपटले. डोक्याला जबर मार बसल्याने पोपट राठोड या तरुणाचा मृत्यू ओढवला. तरुणाच्या खून प्रकरणी सुरेश हंसराज तंवर (22) यांच्या फिर्यादीवरुन संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक धनंजर येरूळे यांनी भेट दिली. तपास सहाय्यक निरीक्षक प्रकाश काळे करीत आहेत.

