आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना 133 कोटी अनुदान वितरणाचा शुभारंभ
48 तासात सर्व शेतकर्यांच्या खात्यात जमा होणार अनुदानाची रक्कम
चाळीसगाव : राज्य शासनाने राज्यातील 40 दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी दुष्काळी अनुदान वितरित करण्याचा शासन निर्णय 29 फेब्रुवारी घेतला होता. त्यात चाळीसगाव तालुक्यातील 84 हजार 471 शेतकर्यांना जवळपास 133 कोटी 19 लाखांचे अनुदान मंजूर झाले असून ते थेट शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्याचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. येत्या 48 तासात चाळीसगाव तालुक्यातील सर्वच शेतकर्यांच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यांची होती उपस्थिती
यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार जतेंद्र धनराळे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



नैसर्गिक आपत्ती, दुष्काळी परिस्थिती उद्भवल्यास मदतीची मर्यादा 2 हेक्टर वरून तीन हेक्टर करण्यात आली आहे.
तसेच प्रति हेक्टरी अनुदान देखील वाढविण्यात आले असून त्यात बहुवार्षिक पिके – 22500/- प्रति हेक्टर, बागायत – 17500/- प्रति हेक्टर, कोरडवाहू – 8500/- प्रति हेक्टर अश्या वाढीव दराने शेतकर्यांना अनुदान वितरीत करण्यात येणार आहे.
चाळीसगाव तालुक्याला प्रथमच एकरकमी 100 कोटींच्या वर मदत मिळाली आहे. शासन निर्णय झाल्याच्या 15 दिवसांच्या आत सदर मदत वितरित केल्याबद्दल मी प्रशासनाचे आभार मानतो.
ऑगस्ट 2021 मध्ये महापुरात घर जनावरे दुकाने जमीन खरडणे नुकसान झालेल्या महापूरग्रस्तांना 6 कोटी निधी मंजूर झाला आहे,
त्यातील ज्या शेतकर्यांच्या जमिनी खरडल्या होत्या अश्या 19 गावातील 567 शेतकर्यांना 80 लाख निधीचे प्राप्त आहे. येत्या 8 दिवसांच्या आत त्यांची नुकसानभरपाई थेट बँक खात्यात जमा होईल.
जास्तीत जास्त मदतीचा प्रयत्न : आमदार
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यात पुढील काळात चारा छावणी, पाणी टँकर, शैक्षणिक शुल्कमाफी, पीककर्ज पुनर्गठन यामाध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, असे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले. ही भरघोस अशी मदत मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिलदादा पाटील, पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांचे चाळीसगाव वासीयांच्या वतीने आभार मानतो, असेही आमदार मंगेश रमेश चव्हाण म्हणाले.





