जळगावातील शिवभक्तांवर क्रुर काळाचा घाला : भरधाव ट्राला क्रुझरवर आदळून तिघे ठार
चौघे भाविक जखमी : बांभोरी गावाजवळ भीषण अपघात
Cruel attack on Shiv devotees in Jalgaon : Three killed after high-speed trawl collides with cruiser जळगाव : शिवभक्तांच्या क्रुझरला समोरून आलेल्या भरधाव ट्रालाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात जळगावातील तिघा भाविकांचा मृत्यू ओढवला तर चौघे जखमी झाले. हा भीषण अपघात बांभोरी गावाजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडला. खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागातील महादेव मंदिरासाठी शिवलिंग घेण्यासाठी सर्व भाविक क्रुझरने ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जात असताना हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले.
या शिवभक्तांचा मृत्यू
या अपघातात तुषार जाधव (25, रा.खोटे नगर, मूळ गाव धोबी वराड), विजय हिंमतराव चौधरी (42, रा.साई नगर), भूषण सुभाष खंबायत (45, रा.साईनगर) यांचा मृत्यू ओढवला तर अन्य चौघे भाविक जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बांभोरी ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी क्रेन मागवून क्रूझर बाजूला करण्यात आली.


अवघ्या काही क्षणात भाविकांचा मृत्यू
जळगाव शहरातील साईनगर भागात शिव मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरातील शिवलिंग घेण्यासाठी शुक्रवार, 15 मार्च रोजी पहाटे पाच वाजता सर्व भाविक क्रुझर गाडीने ओंकारेश्वरकडे निघाले होते. मात्र घरापासून अवघ्या पाच मिनिटांचा अंतरावरच बांभोरी गावाजवळ समोरून येणार्या ट्रालाने क्रुझरला जोरदार धडक दिल्याने तिघा भाविकांचा मृत्यू ओढवला. या अपघाात दिलीप साळुंखे, के. डी. पाटील, अनिल ठाकरे, बापू पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त वाहने पाळधी पोलीस ठाण्यात नेण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांनी धाव घेतली असून मोठी गर्दी जमलेली आहे.