रावेर लोकसभा लढवण्यासाठी आता आमदार खडसें पाठोपाठ अ‍ॅड.रोहिणी खडसेंचाही नकार !


Adv. Rohini Khadse also refused to contest Raver Lok Sabha ! भुसावळ (गणेश वाघ) : लोकसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपाने रावेरसाठी खासदार रक्षा खडसे यांना तिसर्‍यांदा संधी दिली तर जळगावात मात्र उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना संधी दिली आहे. रावेर लोकसभेच्या जागेसाठी सर्वाधिक चुरस एकीकडे असताना दुसरीकडे मविआकडून अद्यापही या जागेवर उमेदवाराची निश्चिती झालेली नाही. आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे नकार दिला  तर दुसरीकडे राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी नाशिकच्या बैठकीत अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करीत त्यांना उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला मात्र अ‍ॅड.रोहिणी यांनीही नम्रपणे त्यास नकार देत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बाहुबली उमेदवाराला मिळणार संधी !
दरम्यान, ही निवडणूक भाजपासाठी सोपी ठरू नये यासाठी राष्ट्रवादीनेही कंबर कसली असून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू  करण्यात आला आहे. एका बाहुबली उमेदवाराला ही संधी मिळणार असल्याची खात्रीशीर सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, शिवसेना (उबाठा गट) या जागेवर दावा करू शकते किंवा काँग्रेसकडूनही जागेची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लवकरच रावेरच्या जागेवरील पेच सुटणार आहे. राष्ट्रवादीकडून अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनादेखील पर्याय म्हणून पाहिले जात आहे तर एका बाहुबली उमेदवाराला फाईट देण्यासाठी रींगणात उतरवण्याच्या तयारीत मविआ आहे. शनिवार, 16 मार्च रोजी या उमेदवाराच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.




प्रकृतीमुळे निवडणूक लढण्यास आमदार खडसेंचा नकार
भाजपाने रावेर लोकसभा मतदारसंघासाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्याविरोधात मविआतर्फे एकनाथराव खडसे उमेदवारी करणार का? अशा चर्चा सुरू होत्या मात्र आमदार खडसे यांनी प्रकृतीचे कारण पुढे करीत निवडणूक लढण्यास असमर्थता व्यक्त केली. गुरुवारी नाशिकमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांनी अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी रावेरची उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला मात्र अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनीदेखील रावेरची उमेदवारी करण्यास नम्रपणे नकार दिला आहे. आपण विधानसभेसाठी इच्छूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या वृत्ताला स्वतः आमदार एकनाथराव खडसे यांनी दुजोरा दिला.

रावेर मतदारसंघात निर्माण झाला पेच
पवार गटाचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांच्या सुनेला उमेदवारी देऊन भाजपाने रावेर मतदारसंघात मविआसमोर पेच निर्माण केला आहे. आता भाजपविरोधात लढायचे की ती जागा कमी क्षमतेचा उमेदवार देऊन सोडायची या द्विधा मनस्थितीत शरद पवार गट असताना राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र कुठल्याही परीस्थितीत ही जागा हातून न जाण्यासाठी प्रयत्नशील आहेत. रावेरच्या जागेसाठी अद्यापही मविआकडून उमेदवार देण्यात आला नसलातरी तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरू असून शनिवारी उमेदवाराच्या नावाची घोषणा होवू शकते. शिवसेना व काँग्रेसही या जागेसाठी इच्छूक असल्याने लवकरच या जागेचा निर्णय होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !