जळगावच्या तुकारामवाडीत जुन्या वादातून प्राणघातक हल्ला : सहा आरोपींना अटक
Assault due to old dispute in Jalgaon’s Tukaramwadi : Six accused arrested
जळगाव : जळगाव शहरातील तुकारामवाडी येथे राहणार्या जुन्या वादातून एकाच्या घरात घुसून शिवीगाळ करत घराचे दरवाजे व खिडकी तोडून नुकसान करण्ण्यात आले तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी रात्री 9 वाजता घडली होती. एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल होताच सहा संशयित आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी मंगळवार, 9 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता वाघ नगर परिसरातून अटक केली.
असे आहे हल्ला प्रकरण
जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात अरुण भीमराव गोसावी (47) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. 2022 मध्ये झालेल्या खूनाच्या संदर्भात संशयित आरोपींविरोरात अरूण गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. याचा राग आरोपींच्या मनात आहे व त्यावरून संशयित आरोपी भूषण उर्फ भासा विजय माळी, आकाश उर्फ सुकलाल खंड्या ठाकूर, पवन उर्फ बंद्या दिलीप बाविस्कर, सचिन उर्फ टिचकुल्या कैलास चौधरी (सर्व रा.तुकाराम वाडी, जळगाव) व आकाश उर्फ ब्रो रवींद्र मराठे आणि चेतन उर्फ बटाट्या रमेश सुशील (दोन्ही रा.पिंप्राळा) यांनी शनिवार. 6 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता अरुण गोसावी यांच्या घरावर जीवघेणा हल्ला चढविला. यात संशयीत आरोपींनी अरुण गोसावी यांच्या घरात घुसून त्यांच्या घराचे दरवाजे खिडक्या आणि घरातील सामानांची तोडफोड करून नुकसान केले व शिविगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या संदर्भात दुसर्या दिवशी रविवार, 7 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


आरोपींना एका दिवसांची कोठडी
या गुन्ह्यातील संशयित आरोपी पसार झाल्यानंतर त्यांचा शोध सुरू असताना ते मंगळवार, 9 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता वाघ नगरात येताच त्यांना अटक करण्यात आली. अटकेतील संशयित आरोपींना बुधवार, 10 एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, ललित नारखेडे, छगन तायडे, किरण पाटील, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, संजीव मोरे आणि साईनाथ मुंडे यांनी केली.