खाकीत माणुसकी आजही जिवंत : मनोरुग्णाला दिले नातेवाईकांच्या ताब्यात
भुसावळ : खाकीमध्ये अद्यापही माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी पुन्हा एकदा आणून दिला. जंक्शन शहरात गेल्या सहा दिवसांपासून अनोळखी मनोरुग्ण भटकत असतानाच त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात मनोरुग्णाला देण्यात आले. कालिका उदयीत नारायण पांडे (रा.रजियापूर, ता.संडहा, जि.अमेठी, उत्तर प्रदेश) असे या मनोरुग्णाचे नाव आहे.
पोलिसांच्या सतर्कतेने मनोरुग्णाने गाठले घर
पांडे हा रुग्ण असून तो शहरात मागील आठवड्यापासून फिरत असतानाच खडका रोड भागातील ममता डेअरीजवळ जाऊन पोहचला. तो वेडसर चाळे करीत असल्यामुळे मोहम्मद तेलहा शरीफोद्दीन यांनी त्यास बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणले व पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांची भेट घेत त्यांच्या ताब्यात मंगळवार, 25 फेब्रुवारी रोजी सकाळी देण्यात आले. त्यानंतर ठाणे अंमलदार वाल्मिक सोनवणे यांना निरीक्षक भागवत यांनी त्याच्या नातेवाईकाचे शोध घेण्याचे आदेश दिले मात्र संबंधीत मनोरुग्ण असल्यामुळे शोध घेणे खुपच कठीण होते मात्र बाजारपेठ पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचार्यांना वेळ लागेल, असे वाटत असतांना तपासचक्रे वेगाने फिरली व दुसर्याच दिवशी अधिकार्यांनी शोध लावला व त्या इसमाच्या नातेवाईकांना भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले. यावेळी कालिका उदयीत नारायण पांडे यास बाजारपेठ पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांनी त्यास नातेवाकांच्या ताब्यात दिले. यावेळी शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी, सहायक फौजदार तस्लीम पठाण, वाल्मिक सोनवणे, मिलिंद कंक, सुनील जोशी, रमण सुरळकर, दीपक कापडणे, विकास सातदिवे, तुषार पाटील, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी उपस्थित होते. पोलिसांनी नुसतीच मनोरुग्णाच्या कुटुंबियांची भेट घडवली नाही तर त्याच्या जेवणासह कपड्यांचीही व्यवस्था करीत खाकीत माणसुकी शिल्लक असल्याचा प्रत्यय पुन्हा आणुन दिला.



