चांदवड घाटात बसचा भीषण अपघात : पाच प्रवासी जागीच ठार
Bus accident in Chandwad Ghat : Five passengers killed on the spot चांदवड : एस.टी. बस ट्रकला ओव्हरटेक करत असताना ट्रकने अचानक लेन कटिंग केल्याने झालेल्या अपघातात बस कापली गेल्याने महिला प्रवाशासह पाच जण जागीच ठार तर 34 जखमी झाले होते. हा भीषण अपघात मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवडजवळ मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता घडला होता. दरम्यान, 34 जखमींपैकी 15 गंभीर जखमींवर चांदवड, मालेगाव, पिंपळगाव व नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत.
पाच प्रवासी जागीच ठार
वसई आगाराची बस (एम.एच.14 के.यू.3631) जळगाव येथून वसईला जात असताना मंगळवारी सकाळी साडेनऊला भीषण अपघात घडला. या अपघातात साई संजय देवरे (14, रा.उमराणे), बळीराम सोनू आहिरे (71, रा.डिसूझा कॉलनी, नाशिक), सुरेश तुकाराम सावंत (28, रा.डोंगरगाव, ता.देवळा), बसचा वाहक विनोद पोपट शिंदे (38, रा.जेऊर पाथर्डी, ता.मालेगाव) व खालिदा गुलाम हुसेन (60, रा.भिवंडी, ठाणे) यांचा मृत्यू झाला.


मृतांच्या वारसांना 10 लाख
मृतांच्या नातलगाना 10 लाख तर जखमींना उपचाराच्या बिलानुसार पूर्ण रक्कम अदा केली जाणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी रुग्णांची विचारपूस करताना सांगितले. एस.टी. महामंडळानेही मृत व जखमींच्या नातलगांना तातडीची मदत देण्यासाठी कार्यवाही केली. तसेच पुढील मदतीसाठी जखमींनी जवळच्या बस डेपोमध्ये वैद्यकीय बिलांसह संपर्क साधण्याचे आवाहन केले.