प्रत्येक मतदान केद्रावर मंडपासह व्हीलचेअर, पाळणा घराची सुविधा
भुसावळात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : मतदानाचे आवाहन
भुसावळ : शासनाकडून यंदा प्रत्येक मतदान केंद्रावर मंडप, व्हीलचेअर, पाळणाघर, आरोग्य केद्र, वैद्यकीय अधिकारी, बेड सुविधा आदी सुविधा पुरवल्या जाणार असून लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सावात नागरिकांनी सहभागी होवून जास्तीत-जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन भुसावळात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. ते म्हणाले की, निवडणुकीच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली असून मतदान आता अवघ्या शंभर तासांवर आले आहे.
यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे आदींची उपस्थित होती.

12 प्रकारचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, मतदारांनी मतदान करण्यासाठी घरातून बाहेर पडावे व जास्तीत-जास्त मतदान करावे. रावेर लोकसभा मतदार संघात सहा मतदारसंघ असून त्यात 18 लाख 21 हजार 750 मतदार आहेत तर एक हजार 904 मतदान केंद्रे आहेत. तेथे 11 हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतील. मतदान यंत्रे व साहित्य हे रविवार, 12 मे रोजी सकाळी आठ वाजेपासूनच कर्मचार्यांना दिले जातील. दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व कर्मचारी त्यांना दिलेल्या मतदान केंद्रावर दाखल होतील. 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टींग होणार असल्याने तेथील परीस्थिती लाईव्ह दिसेल. 147 ठिकाणी मायक्रो निरीक्षक असतील व प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त असेल. निवडणूक कामी असललेया सर्वच वाहनांना जीपीएस यंत्रणा असेल. मतदान केंद्रावर मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.




