नैसर्गिक आपत्तीमुळे मृत पशू पालकांना तत्काळ भरपाई द्यावी : अॅड.रोहिणी खडसे यांची मागणी
मुक्ताईनगर : गेल्या दोन दिवसांपासुन मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तापमानाचा पारा 45 अंशापर्यंत गेला असताना अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने तालुक्यात शेती, घरे गोठयांचे मोठे नुकसान झाले आहे. मार्च महिन्यात झालेले वादळ आणि एप्रिल मे महिन्यातील उष्ण तापमानामुळे झालेल्या केळी बागांच्या नुकसानीतुन शेतकरी सावरत असताना आता आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कापणीला आलेल्या हजारो हेक्टरवरील केळी बागा भुईसपाट होऊन शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. यातच काल रविवार संध्याकाळी कुर्हा काकोडा परिसरात आलेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसात
बोरखेडा येथे वीज कोसळून हिरामण मदने या पशुपालकाच्या 90 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. पशुधनाच्या मृत्यूने हिरामण मदने यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोरखेडा येथे घटनास्थळी भेट देऊन हिरामण मदने यांना धीर दिला व मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क साधून पशूशल्य चिकित्सक यांना मृत शेळ्यांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्याविषयी सूचना देण्यासह हिरामण मदने यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा केली.

आचारसंहिता बाजूल ठेवून मदत करा
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या की, मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांचे गोठयांचे शेतीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. विशेषतः केळी बागा जमीमनदोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानीचे पंचनामे करून आचारसंहिता बाजूला ठेऊन नुकसान ग्रस्तांना तत्काळ मदत मिळवून देण्याविषयी जळगाव जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. कोणताही पशू पालक हा आपल्या घरातील सदस्याप्रमाणे आपल्या जनावरांची काळजी घेतो. वीज कोसळून हिरामण मदने यांच्या शेळ्या दगावल्याने त्यांच्यावर संकट कोसळले असुन त्यांचे नुकसान झाले आहे. याबाबत मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत कृषी अधिकारी व पशु शल्य चिकित्सकांना मृत पशुधनाचे पंचनामे करून शवविच्छेदन करण्या बाबत सुचना करण्याविषयी चर्चा केल्याची व हिरामण मदने यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, कुर्हा सरपंच डॉ.बी.सी.महाजन, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटील, संतोष चव्हाण, उपसरपंच भरत मदने, मनोज हिवरकर, राजू खोले, शिवराम मदने उपस्थित होते.




