भुसावळात व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने पाळला कडकडीत बंद
दोघांच्या हत्येनंतर शहरात तणावपूर्ण शांतता : वाल्मीक नगरात बंदोबस्त वाढवला
भुसावळ : भुसावळातील भाजपाचे माजी नगरसेवक संतोष मोहन बारसे (45, रा.वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे (42, रा.मोरेश्वर नगर, हिरोहोंडा शोरूमच्या मागे, जळगाव रोड, भुसावळ) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील जुना सातारा भागातील मरिमाता मंदिरासमोर घडली होती. हल्ल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने त्याचे पडसाद गुरुवारी शहरात उमटले. व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने अघोषित बंद पाळल्याने शहरातील संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. व्यापारी पेठ बंद असल्याने लाखो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. दरम्यान, आज शुक्रवारी शहरात व्यवहार मात्र पूर्ववत सुरू झाले आहेत.
मयत बारसे भाजपाचे माजी नगरसेवक
शहरातील जुना सातारा भागात स्वीप्ट कारमधून येत असलेल्या बारसे व राखुंडे यांच्यावर पथरोड टोळीतील सदस्यांनी बेछूट गोळीबार केल्याने दोघांचा मृत्यू ओढवला होता. मयत बारसे हे भाजपाचे माजी नगरसेवक होते व पहेलवान पूत्र ग्रुपचे संस्थापक अध्यक्षही होते. अलीकडेच त्यांनी राज्यभरात आपल्या ग्रुपच्या शाखा उघडत आपला जनसंपर्कदेखील वाढवला होता. त्यांच्या हत्येनंतर वाल्मीक नगरात शोककळा पसरली. पोलिसांनी या भागात रात्रीपासूनच वाढीव बंदोबस्त तैनात केला आहे तर शहरात जिल्ह्यावरून मोठा बंदोबस्तही मागवण्यात आला आहे.


भुसावळ शहर कडकडीत बंद
गुरुवारी भुसावळ शहरातील व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळल्याने बाजार पेठेत शुकशुकाट दिसून आला. शहरातील ज्या भागात खुनाची घटना घडली त्या जुना सातारा परिसरातील सर्व दुकानांसह बाजारपेठ हद्दीतील मुख्य व्यापारी पेठ, फळ बाजार, भाजीपाला मार्केट, सराफा बाजार, कपडा मार्केट तसेच मॉडर्न रोड परिसरातील काही भागातील दुकाने कडकडीत बंद होती तर बसस्थानकालगतच्या परिसरातील काही दुकाने मात्र सुरू होती.
