रावेरात चोरीच्या सात दुचाकी जप्त
दुचाकी चोरीच्या तपासात लालमातीचा चोरटा गवसला : रावेर पोलिसांची कामगिरी
रावेर : दुचाकी चोरीच्या तपासात रावेर पोलिसांना मोठे यश मिळाले असून तालुक्यातील लालमाती येथील संशयीताला पोलिसांनी अटक करीत त्याच्याकडून तब्बल चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या आहेत. या आरोपीकडून आणखी काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. अरमान अजीत तडवी (रा.लालमाती, ता.रावेर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
रावेर पोलिसांची मोठी कामगिरी : सात दुचाकी जप्त
तक्रारदार अमर पाटील यांची 12 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची बॉक्सर दुचाकी (एम.एच.19 बी.9946) ही चोरी गेल्याने या प्रकरणाचा रावेर पोलिसांकडून तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश चौधरी यांना लालमातीच्या संशयीतांची माहिती मिळाली होती. त्यानंतर हवालदार राजेंद्र राठोड, पोलिस नाईक निलेश चौधरी, संदीप धनगर, नरेंद्र बाविस्कर, मंदार पाटील आदींनी आरोपी अरमान अजित तडवी (रा.लालमाती) यास अटक केली असता आरोपी तडवीने रावेर परीसरातून सात दुचाकी चोरल्याची कबुली देत दुचाकी काढून दिल्या. जप्त दुचाकींमध्ये बजाज बॉक्सर, टीव्हीएस व्हिक्टर, हिरो पॅशन प्रो, बजाज फोर एस, यामाहा, बजाज सिटी 100, हिरो आदी दोन लाख 42 हजार रुपये किंमतीच्या दुचाकींचा समावेश आहे. ज्या तक्रारदारांची दुचाकी चोरीला गेली आहे अशांनी मूळ कागदपत्रे दाखवून पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रावेर पोलिसांनी केले आहे.



