खिर्डीत अवैध गावठी दारूमुळे तरुणांचे आयुष्य धोक्यात
शाळेसह धार्मिक स्थळांजवळ खुलेआम विक्री ; पोलिसांची चुप्पी
खिर्डी : रावेर तालुक्यातील खिर्डी गावात अवैध गावठी दारूचा पूर वाहत असून पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होत नसल्याने विक्रेत्यांचे फावले आहे. खिर्डी बस स्टँड परिसरात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत खुलेआम देशी व गावठी हातभट्टीची दारू विक्री होते. कामगारवर्ग व नवयुवकांना दारूचे व्यसन लागल्यामुळे युवा पिढी बरबाद होत आहे. देशी व गावठी दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत तर तरुण वयात महिलावर्गाला विधवा होण्याची वेळ आली आहे.
कष्टाची कमाई गावठी दारूत खर्ची
महिला वर्ग दिवसभर शेतात काबाड कष्ट करून आपल्या घरसंसाराला आर्थिक मदत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतांना दिसतात मात्र महिलांना मारहाण करून त्यांना मिळालेले मजुरीचे सर्व पैसे दारूडे दारूवर उडवत आहेत. मूलबाळ उपाशी आणि तळीराम मात्र तुपाशी असे चित्र गावात आहे. काही मुलींना बाप दारुड्या झाल्यामुळे मुलींना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. शिक्षणाला मुकलेल्या मुली सध्या आपल्या आई सोबत शेतात कामाला जात असून वा केळीचे घड वाहण्यास जात आहेत.


दारूचे व्यसन असल्याने मिळालेला सर्व पैसा दारू पिण्यात जातो. दारू विक्रिस ग्राहकांचा प्रतिसाद असल्याने व आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे अनेक व्यक्तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. काही तळीराम दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात तर काही अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात असल्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्या महिला, विद्यार्थी व वाहनधारकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तक्रार देण्यास कुणी पुढे येत नाही यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी व ग्रा.पं प्रशासन व दारूबंदी कमेटी पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने गावातून अवैध देशी, गावठी दारू विक्री बंद होईल का? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.