मंत्री रक्षा खडसेंनी घेतला मेगा रिचार्ज योजनेचा आढावा

19 हजार 244 कोटींचा प्रकल्प अहवाल तयार : लवकरच बैठक


Minister Raksha Khadse reviewed the Mega Recharge Scheme मुक्ताईनगर : रावेर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख तालुक्यांसाठी वरदान ठरणार्‍या तापी नदीवरील ‘मेगा रिचार्ज’ अर्थात तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनेबाबत (मेगा रिचार्ज) केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी निवासस्थानी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकार्‍यांकडून आढावा घेतला. राज्यातील जळगाव, बुलढाणा, अकोला अमरावती या जिल्ह्यातील दोन लाख 13 हजार 706 हेक्टर क्षेत्र तसेच मध्यप्रदेशातील खंडवा, बर्‍हाणपूर या जिल्ह्यातील 96 हजार 82 हेक्टर क्षेत्रात पाणी पुनर्भरण होऊन भूजल पातळी वाढीमुळे अप्रत्यक्ष सिंचनाचा फायदा होणार आहे.

अशी आहे योजना
तापी नदीचे गुजरातला वाहून जाणारे पाणी मेळघाटातील खारीया घोटीजवळ अडवून नंतर उजव्या आणि डाव्या कालव्यांच्या माध्यमातून त्याचे जमिनीत पुनर्भरण केले जाणार आहे. यासाठी सातपुड्याच्या रांगेतून मध्य प्रदेशातील अशीरगडपासून तापी नदीचे पाणी कालव्यांद्वारे वळवून रावेर, यावल, चोपडा तालुक्यांतील नदी- नाल्यात उतरून मेगा रिचार्ज होऊ शकणार आहे.
यासाठी मध्य प्रदेशातील खारीया घोटी येथे तापी नदीवर धरण बांधून त्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी पावसाळ्यात बर्‍हाणपूर, यावल, चोपडा व रावेर तालुक्यांत कालव्याच्या माध्यमातून सर्व नदी-नाल्यांमध्ये पुनर्भरण विहिरी करून पाणी जिरविण्यात येणार आहे.

19 हजार 244 कोटींचा अहवाल तयार
अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार तापी खोरे महाकाय पुनर्भरण योजनेचा 19 हजार 244 कोटींचा अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्य तांत्रिक सल्लागार समिती, नाशिक यांच्या सहमतीसाठी शासनाकडे तो सादर करण्यात आला आहे. केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पुढाकाराने केंद्र शासन स्तरावर जलशक्ती मंत्रालय केंद्र सरकार, दिल्ली येथे लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. योजनेच्या मंजुरीसाठी महाकाय पुनर्भरण योजनेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या लोकप्रतिनिधी व महाराष्ट्र शासन, मध्य प्रदेश शासन, केंद्र सरकारमधील संबंधित सर्व अधिकार्‍यांची बैठक आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला तापी पाटबंधारे विकास महामंडळातर्फे कार्यकारी अभियंता दाभाडे व उपविभागीय अभियंता के.पी.पाटील उपस्थित होते.


कॉपी करू नका.