दक्षिण आफ्रिकेत भुसावळच्या धावपटूंनी वेळेआधीच केली मॅरेथॉन पूर्ण

86 कि.मी. कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग : डॉ. तुषार पाटील यांनी सलग दुसर्‍यांदा कामगिरी


भुसावळ : दक्षिण आफ्रिका येथे नुकत्याच पार पडलेल्या 86 कि.मी. कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या डॉ. तुषार पाटील व विजय फिरके या धावपटूंनी मॅरेथॉन विहित वेळेच्या आधीच पूर्ण करुन आपली चमक दाखवून दिली. यामध्ये डॉ.तुषार यांनी सलग दुसर्‍यांदा ही मॅरेथॉन पूर्ण केली आहे. सलग दोन वर्ष कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये पदक प्राप्त करणारे जळगाव जिल्ह्यातील ते एकमेव धावपटू आहेत. त्याशिवाय विजय फिरके यांनी पहिल्याच प्रयत्नात अतिशय सहजपणे विहीत वेळेच्या आधीच हे आव्हानात्मक अंतर पार केले.

अल्टीमेट ह्युमन रेस म्हणून स्पर्धेची ओळख
1750 मीटर उंचीची चढाई असल्याने या स्पर्धेला जागतिक स्तरावर सर्वात आव्हानात्मक व अल्टीमेट ह्युमन रेस म्हणून ओळख आहे. जगातील सर्वात जूनी अशी मॅरेथॉन कॉमरेड्स मॅरेथॉन असून सीएमए बोर्ड, दक्षिण आफ्रिका यांच्या वतीने यावर्षी 97 वी कॉम्रेड मॅरेथॉन डर्बन येथे आयोजित करण्यात आली होती. दक्षिण आफ्रीकेतील वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता कॉम्रेड मॅरेथॉन डर्बन सेंट्रल पोस्ट ऑफीसपासून सुरू झाली व पिटर्समारीबर्ग ला सायंकाळी 5.30 वाजता समाप्त झाली. 12 तासांची कालमर्यादा असलेल्या या स्पर्धेत डॉ.तुषार पाटील यांनी केवळ 10 तास 35 मिनिटे व 37 सेकंदात ही कामगिरी पूर्ण केली तर विजय फिरके यांनी 11 तास 32 मिनिटे व 26 सेकंदात हे निर्धारित अंतर पूर्ण केले.



जगभरातून 20 हजार धावपटू सहभागी
जगभरातील सुमारे 20 हजारांपेक्षा जास्त धावक या स्पर्धेत सहभागी झाले. भारतातील 366 धावकांनी कॉम्रेड स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात 336 पुरुष तर 30 महिलांचा सहभाग होता. महाराष्ट्रातून 22 महिला सहभागी झाल्या होत्या, त्यापैकी 16 महिलांनी ही स्पर्धा 12 तासाच्या कालमर्यादेत पुर्ण केली.

भुसावळात जोरदार स्वागत
भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे डॉ. तुषार पाटील व विजय फिरके यांचे रेल्वे स्टेशनवर स्वागत करण्यात आले. यावेळी असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक, डॉ.चारुलता पाटील, संजय भदाणे, अजय आंबेकर, डॉ.निर्मल बलके, प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !