माजी मंत्री खडसेंचे लवकरच भाजपामध्ये कमबॅक : अमित शहांची घेतली भेट


मुंबई : भाजपा प्रवेशासाठी वेटींगवर असलेले माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी स्नुषा व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंसमवेत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीतील चर्चेचा तपशील उघड झाला नसलातरी आमदार खडसेंचे मात्र भाजपात लवकरच कमबॅक होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपात फेरबदलाची शक्यता ?
राज्य भाजपच्या कामगिरीबद्दल केंद्रीय नेतृत्त्व नाराज आहे. त्यामुळे राज्य भाजपमध्ये लवकरच फेरबदल होऊ शकतात. राज्यात भाजप वाढवण्यात भूमिका बजावणारे आणि फडणवीसांवर आरोप करत पक्ष सोडणारे एकनाथ खडसे लवकरच पक्षात सक्रिय होऊ शकतात. त्यांचा पक्षप्रवेश करुन त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसेंना केंद्रात राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. एकनाथ खडसेंनी रक्षा यांच्यासह दिल्लीत जाऊन अमित शहांची भेट घेतली. त्यानंतर खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात सुरू झाली आहे.


तर मंत्री मंडळातही मिळेल स्थान !
रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांना केंद्रात क्रीडा विभागाचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. केंद्रीय नेतृत्त्व राज्य भाजपाच्या कामगिरीवर असमाधानी आहे. त्यामुळे विधानसभेआधी एकनाथ खडसेंना पक्षात सक्रिय करण्यात येणार असल्याची सुत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात खडसेंना स्थान देण्यात येऊ शकतं. त्यांच्याकडे गृहखात्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या हे खातं देवेंद्र फडणवीसांकडे आहे. विधानसभा निवडणुकीतही फडणवीसच पक्षाचा चेहरा राहिल्यास भाजपला त्याचा फटका बसेल, असा पक्षाचा कयास आहे. गृह मंत्रालयाची जबाबदारी न दिली गेल्यास खडसेंकडे प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचा कार्यकाळ 2025 मध्ये संपणार आहे.

आता लोकसभा निवडणुकीत भाजपची राज्यात झालेली वाताहत पाहता खडसेंना लवकरच नवी जबाबदारी मिळू शकते.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !