भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसे कुटुंबनायक प्रभारीपदी ललितकुमार पाटील
फैजपूर : पाडळसे येथील भोरगाव लेवा पंचायत ठाया संस्थेची नवनियुक्त प्रभारी कार्यकारिणीची सभा पाडळसे नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी कुटुंबनायक रमेश विठू पाटील होते. सभेत भोरगाव लेवा पंचायतीच्या प्रभारी कुटुंब नायक म्हणून ललितकुमार पाटील यांची निवड करण्याचा सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला. यापुढे तेच कुटुंबनायक म्हणून कामकाज पाहतील.
एकमताने निवडला प्रभारी
सभेत रमेश पाटील यांनी तब्येतीच्या कारणास्तव कुटुंब नायक पदाची जबाबदारी सांभाळणे शक्य होत नाही आणि डॉक्टरांनी फिरण्यासाठी निर्बंध लावले आहेत. म्हणून कार्यकारिणीमध्ये हा विषय मांडला. त्यानंतर सर्व प्रभारी कार्यकारिणी सदस्यांमध्ये चर्चा झाली. त्यात संस्थेच्या परंपरेप्रमाणे व नियमावलीमधील तरतुदीनुसार कुटुंबनायक पद हे वंशपरंपरागत असल्याने रमेश पाटील यांच्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांना निबंध आल्याने प्रभारी कुटुंबनायक म्हणून रमेश पाटील यांचे चिरंजीव ललितकुमार रमेश पाटील यांना प्रभारी कुटुंबनायक करण्याबाबत माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी प्रस्ताव मांडला. त्यास माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व आमदार शिरीष चौधरी यांनी अनुमोदन दिले.

कार्यकारिणीच्या विभागीय शाखा बरखास्त
भोरगाव लेवा पंचायतीच्या जळगाव, मलकापूर आणि भुसावळ येथे विभागीय शाखा सुरू करण्यात आल्या होत्या परंतु आता भोरगाव लेवा पंचायतीची नवीन प्रभारी कार्यकारिणी अस्तित्वात आल्याने शाखा बरखास्त करून पुनर्जीवित करण्यात याव्या, असा प्रस्ताव माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी मांडला. त्यास आमदार शिरीष चौधरी यांनी अनुमोदन दिले. सर्वानुमते जळगाव, मलकापूर, भुसावळ येथील तिन्ही शाखा बरखास्त करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला. त्यानंतर कार्यकारिणीच्या संमतीने शाखा सुरू करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे ठरले.
प्र.नवीन कार्यकारिणी जाहीर
सभेत कुटुंब नायक रमेश पाटील, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, रावेर मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, प्रभारी कुटुंब नायक ललितकुमार पाटील, बी.के.चौधरी, जळगाव महानगरपालिकेचे माजी महापौर विष्णू भंगाळे, फैजपूरचे माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे, दिनेश भंगाळे, ज्ञानेश्वर पाटील, अॅड.संजय राणे, एन.टी.पाटील, आरती चौधरी, डॉ.प्रियदर्शनी सरोदे, सुहास चौधरी यांची भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेच्या कार्यकारिणीत निवड करण्यात आली.
मंत्री रक्षा खडसे होणार सन्मानीत
सभेत नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भारत सरकारमध्ये युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री म्हणून निवड झाल्याने सकल लेवा समाजाला हा पहिल्यांदाच बहुमान मिळाल्याने सकल लेवा समाजाच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्याबाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. खडसे यांच्या सोयीची तारीख घेऊन यथोचित सत्कार करून सन्मानित करण्यात येईल, असे यावेळी ठरले.




