फसव्या जाहिरातींपासून सावध रहा : चंद्रकांत चौधरी
थोरगव्हाण : गुटखा, सुपारी, तंबाखू, जर्दा, नशायुक्त सोलेशन आदी कंपनी मालक फसव्या प्रभावी जाहिरातींमधून शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करीत असून बालक व तरुणाईने सावध रहावे, असे आवाहन थोरगव्हाण, ता.रावेर येथील डी.एस.देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यतर्फे आयोजित कार्यक्रमात दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण अध्यक्ष तथा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य सचिव चंद्रकांत चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज कुरकुरे यांनी केले. 26 जून हा जागतिक आंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विद्यार्थ्यांना व्यसनांचे मानवी आरोग्यावर बाल मनावर हेणारे शारिरीक मानसिक आणि आर्थिक दुष्पपरिणामांबाबत नशाबंदी मंडळ जळगाव जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाधन राणे यांनी मार्गदर्शन केले. मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी तर डॉ.दयाधन राणे यांचे स्वागत व सत्कार पर्यवेक्षक डी.के.पाटील यांनी केला. संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर यांनी भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले.
प्रबोधन करणारे चित्र प्रदर्शन
विद्यालयात दर्शनी भागात विद्यार्थांना पाहण्यासाठी प्रबोधन करणारे चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते. मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी मनोगत व्यक्त केले. सामूहिक प्रबोधन प्रतिज्ञा डी.के.पाटील यांनी वदवून घेतली. सूत्रसंचालन वाय.जे.कुरकुरे यांनी तर उपस्थितांचे आभार समिती सदस्य वाय.डी.कोष्टी यांनी मानले. सर्व समिती सदस्य, सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते.

