प्रत्येकाने एक तरी झाड लावावे : नाना पाटील
भुसावळ : पर्यावरण आणि मानवी आरोग्य यावर होणारे परिणाम याविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. निसर्ग नेहमी मानवाला ऑक्सिजन, फळ, औषधी, इंधन रुपाने देत असतो त्यामुळे आपलेदेखील कर्तव्य झाडे लावून निसर्गाचे संगोपन करणे हे आहे. भुसावळ शहराचे तापमान पाहता भुसावळकरांनी एक तरी झाड लावून जगवले तर पाच वर्षात त्याचे परिणाम आपल्याला नक्कीच जाणवतील, असे मत पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील यांनी येथे व्यक्त केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
धर्मोना एंटरप्रायझेस संचलित नुगा बेस्ट थेरपी सेंटर या मोफत आरोग्य केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वृक्ष दान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भुसावळच्या पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील व राधाकृष्ण प्रभातफेरीचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी नगरसेवक दिलीप सोनवणे, व्यापारी छाबडा, सामाजिक कार्यकर्ते आशिष तिवारी, वन्यजीव प्रेमी प्रसाद प्रभुदेसाई यांची उपस्थिती होती. अखिलेश कुमार यांनी प्रास्ताविक केले. राधेश्याम लाहोटी यांनी योगासनांविषयी मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक करून दाखवले. दिलीप सुरवाडे यांनी झाडे लावण्याविषयी आवाहन केले आणि आशिष तिवारी यांनी धर्मोना एंटरप्रायझेस आणि नुगा बेस्ट कंपनीने भुसावळ येथील रहिवाशांसाठी चालवल्या जाणार्या मोफत थेरपीचे कौतुक केले. धर्मोना एंटरप्रायझेसचे संचालक धर्मेंद्र कुशवाह यांनी थेरपीचे फायदे सांगितले. संस्थापक मोना धर्मेंद्र कुशवाह यांनी आरोग्य सर्वोत्तम आहे या विषयावर मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन अखिलेशकुमार धीमान यांनी केले तर आभार प्रदर्शन आरती लोधाटे यांनी मानले. पलक मिश्रा व स्वप्नाली धीमान यांनी सहकार्य केले.





