प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत यावल न. पा ने थकीत अनुदान केले वितरित

माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिला होता आंदोलनाचा इशारा


Former Mayor Atul Patil यावल : यावल शहरात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांचे थकीत हप्ते मार्च 2024 पासून आजपावेतो लाभार्थींना मिळाले नव्हते त्यामुळे ते लवकरात-लवकर वितरीत करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी मुख्याधिकारी यांना देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशार्‍याची दखल घेत लाभार्थींच्या खात्यात अनुदान वर्ग करण्यात आले आहे.

इशार्‍याची पालिकेकडून दखल
शहरात सन 2019 पासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत आजपावेतो 365 घरकुले मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 252 घरकुले सुरू आहे तर 155 घरकुल पूर्ण झाले आहेत. उर्वरीत 97 घरकुले सध्या सुरू आहेत मात्र या घरकुल लाभार्थींना मार्च 2024 पासून ते आजपर्यंत थकीत हप्ते देण्यात आलेले नव्हते. घरकुल लाभार्थी हे सर्वसामान्य लोक असून त्यांनी उसनवारी अथवा इकडून तिकडून लोकांकडून पैसे घेऊन घराची कामे पूर्ण केली आहेत. म्हणून त्यांना लवकरात लवकर थकीत हप्ते वितरित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने यावल नगरपालिकेचे मुख्याधिकारी माकोडे यांनी माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना पत्र देऊन रखडलेले अनुदानाचे हप्ते लाभार्थी यांचे बँक खात्यात जमा झाले असून आपण करणार असलेले आंदोलन करू नये, अशी विनंती केली. लाभार्थींना अनुदान मिळाल्याने लाभार्थींची समस्या सुटली आहे.


योजना प्रभावीपणे राबवा : अतुल पाटील
गेल्या काही महिन्यांपासून प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. घरकुल योजनेचे बँक खाते बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, न्हावी येथून वितरित करण्यात येते व बँकेच्या तांत्रिक अडचणीमुळे अनुदान रखडले होते. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा, न्हावी यांच्याशी संपर्क करून लाभार्थींसह बँकेसमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता. त्याची दखल घेऊन उशीरा का होईना लाभार्थी यांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याने लाभार्थी आनंद व्यक्त करीत आहेत. या पुढे उर्वरीत घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी, अशी सूचना नगरपालिकेकडे केल्याचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील म्हणाले.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !