तापी मेगा रिचार्जसह जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा घेतला आढावा
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी घेतली जलशक्ती मंत्री सी.आर. पाटलांची भेट
मुक्ताईनगर : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेऊन विविध योजनांना गती देण्याबाबत चर्चा केली. त्यात तापी महाकाय पुनर्भरण योजना (मेगा रिचार्ज प्रकल्प) तसेच बोदवड उपसा सिंचन योजना, कुर्हा वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजना, शेळगांव बॅरेज प्रकल्पाबाबत चर्चा करण्यात आली.
योजनांना गती देण्याची अपेक्षा
बुलडाणा जिल्ह्यात पूर्णा नदीवर जिगाव प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पाद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील सहा तालुके व अकोला जिल्ह्यातील दोन तालुक्यांमधील एकूण एक लाख 16 हजार 770 हेक्टर अवर्षणप्रवण क्षेत्रावर 15 उपसा सिंचन योजनांद्वारे सिंचन निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. केंद्रीय जल आयोगाच्या तांत्रिक सल्लागार समितीद्वारे प्रकल्पास 7,764.39 कोटी किंमतीच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली आहे तसेच महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यांसाठीचा महत्वाकांक्षी तापी महाकाय पुनर्भरण योजनेत तापी नदीतून गुजरातला वाहून जाणार्या 45.50 टीएमसी पाण्याचा वापर होणार आहे त्यामुळे चार लाख 11 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होईल. या योजनेमुळे प्रत्यक्ष सिंचन एक लाख दोन हजार हेक्टरमध्ये होणार असून, महाराष्ट्रात 24 हजार हेक्टर तर मध्य प्रदेशात 78 हजार हेक्टरमध्ये होईल. पुनर्भरणाद्वारे अप्रत्यक्ष लाभ महाराष्ट्राला दोन लाख 11 हजार हेक्टर तर मध्यप्रदेशला 96 हजार हेक्टर असा एकूण तीन लाख 10 हजार हेक्टर क्षेत्रात अप्रत्यक्ष लाभ होणार आहे. तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्य यांचे मार्फत नियोजनासाठी संयुक्त बैठक घेणे आवश्यक असल्याची केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर.पाटील यांना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी माहिती दिली. दोन्ही प्रकल्पांना गती देणेबाबत मागणी केली असता, मंत्री सी.आर.पाटील यांनी तत्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.





