भुसावळातील आपले सरकार केंद्राकडून ‘लाडकी’च्या अर्जासाठी 800 रुपये शुल्काची मागणी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीकचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन


भुसावळ : शहरातील डी.एस.हायस्कूल संकुलातील चव्हाण यांच्या आपले सरकार केंद्र डिजीटल सेवा कॉमन सर्व्हिस सेंटरमधून लाडकी बहिण योजनेत लाभार्थींकडून अर्ज भरण्यासाठी तब्बल 800 रुपये उकळले जात असल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने प्रांताधिकार्‍यांकडे निवेदनाव्दारे केला आहे. यामुळे या केंद्राची चौकशी करून परवाना तत्काळ रद्द करावा, असेही निवेदनात नमूद आहे.

लाभार्थींची केंद्रावर पिळवणूक
रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीकचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आपण स्वत: सोमवारी चव्हाण यांच्या आपले सरकार सेवा केंद्रात पत्नीच्या नावे अर्ज भरण्यासाठी गेलो. या ठिकाणी पहिल्याच टेबलवर बसलेल्या कर्मचार्‍यास मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी किती रुपये लागतील? याबाबत विचारणा केली. यावर त्याने 800 रुपये सांगितले. ही रक्कम ऐकून आपण चकित झालो. यामुळे या केंद्रात गोरगरिब व निरीक्षरांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून आले. जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, उत्पन्न, प्रतिज्ञापत्र, नॉन क्रिमिलेअर आदी दाखल्यांसाठी शासनाने मुल्य ठरवून दिले आहे. असे असतानाही अव्वाच्या सव्वा रक्कम घेतली जात आहे.


याबाबतच्या शुल्काचे फलक सेवा केंद्रामध्ये लावले गेले नाहीत. यामुळे नागरिकांना माहिती मिळत नाही. या काळात लाडकी बहिण योजनेसाठी लाभार्थींची फसवणूक होत आहे. यामुळे प्रचलित दरापेक्षा अधिक रक्कम घेणार्‍या केंद्रांची चौकशी करून त्यांचे परवानगी रद्द करावी तसेच नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटीकचे जिल्हाध्यक्ष विजय साळवे, तालुकाध्यक्ष संदीप सपकाळे, तालुका संघटक शशिकांत रायमळे, शहर संघटक उमेश पठारे, सुदाम सोनवणे, राष्ट्रीय दलित पॅन्थरचे सिध्दार्थ सोनवणे आदींनी केली आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !