भुसावळातील विद्यार्थी वाहनांची कसून तपासणीसह कारवाई करा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद : विविध विभागांचा आढावा : बालिकेवरील अतिप्रसंगाची गंभीर दखल
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातील साडेतीन वर्षीय अल्पवयीन चिमुकलीचा स्कूल व्हॅन चालकाने विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भुसावळात शुक्रवारी प्रांताधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या सर्व वाहनांची कसून तपासणी करून दोषी असणार्यांविरोधात कठोर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या. विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनधारकांची माहिती शाळांनी ठेवण्याबाबत सर्व शाळांना पत्र देण्यासह आरटीओ विभागाने या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले तसेच लाडकी बहिण योजनेचा लाभ जास्तीत-जास्त महिलांना मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
यांची बैठकीला उपस्थिती
भुसावळातील प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवार, 5 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीला प्रांताधिकारी जितेद्र पाटील, डीवायएसपी कृष्णात पिंगळे, तहसीलदार निता लबडे, उपमुख्याधिकारी लोकेश ढाके यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी यांची उपस्थिती होती.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पाळा : जिल्हाधिकारी
अल्पवयीन बालिकेसोबत घडलेल्या घटनेविषयी जिल्हाधिकार्यांनी चिंता व्यक्त करीत दोषी आरोपीवर कठोर कारवाई होण्यासंदर्भात त्यांनी पोलीस उपअधीक्षकांना सूचना केल्या. शहरासह तालुक्यातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या सर्व स्कूल वाहनांची तातडीने तपासणी करून संबंधिताकडे वाहन परवाना, परमीट आहे वा नाही याची खातरजमा करून कारवाईच्या सूचना त्यांनी केल्या शिवाय शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी एमपीडीए व हद्दपारीचे प्रस्ताव तयार कररून गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल, अशी कृती अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व शाळांना पत्र द्या
भुसावळ शहरातील सर्व शाळांना भुसावळ प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्र देण्याच्या सूचना प्रसाद यांनी केल्या. भुसावळसह मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यातील शाळांमध्ये ज्या वाहनाने विद्यार्थ्यांची वाहतूक होत असेल, त्या सर्व वाहनचालकांची माहिती, त्याचे नाव, वाहनाचा प्रकार, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, त्यांची चारीत्र्य पडताळणी झाली आहे का, गाडी नंबर याची मातिहती शाळांनी संकलीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
भुसावळात लागणार सीसीटीव्ही कॅमेरे
शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचा दुवा ठरणार असून लवकरच डीपीडीसीतून हे कॅमेरे पोलिसांनी सूचवलेल्या जागांवर लावण्यात येणार आहे. या कॅमेर्यांसाठी लागणारी एनओसी तातडीने पालिकेने द्यावी, असे आदेश जिल्हाधिकार्यांनी पालिका प्रशासनाला दिले.
लाडली बहिण योजनेचा लाभ मिळावा
राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या लाडली बहिण योजनेचा निकषात बसणार्या लाभार्थींना लाभ मिळावा तसेच महिलांची गैरसोय होवू नये या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्यांनी तहसीलदारांना दिल्या. अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून ग्रामीण भागात हे काम होणार असल्याने सीडीपीओ यांनाही सूचना करण्यात आल्या.




