आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणार्यांवर कारवाई करा : आमदार एकनाथराव खडसे
भुसावळ : शेतकरी बांधवांची तूर खरेदी करताना काही व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकरी बांधवांची लूट करत असल्याबाबत शुक्रवार, 5 जुलै रोजी आमदार एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला.
कमी भावात तूर खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल होणार का ?
आमदार खडसे म्हणाले की, तूर खरेदीसाठी शासनाने ठरविलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही काही व्यापारी, संस्था शेतकर्यांकडून कमी भावात तूर खरेदी करतात. यामुळे शेतकरी बांधवांचे नुकसान होत आहे. अशा कमी भावात तूर खरेदी करणार्यांवर शासन गुन्हे दाखल करणार काय? राज्यात नेमकी किती तूर खरेदी केंद्रे सुरू आहेत? आणि शेतकरी उत्पादक कंपनीला तूर खरेदीची परवानगी देताना ठराविक तूर खरेदीची मर्यादा घातली जाते, ती मर्यादा संपल्यानंतर तूर विक्रीसाठी शेतकर्यांची अडचण होते त्यामुळे ती मर्यादा काढून टाकावी आणि ज्या ठिकाणी खरेदी विक्री सहकारी संघ तूर खरेदीसाठी सक्षम असतील आणि त्यांनी परवानगी मागितली तर तूर खरेदी करण्यासाठी खरेदी विक्री संघांना परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आमदार एकनाथराव खडसे यांनी केली.

सर्व शेतकर्यांची तूर खरेदी होणार
कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, शासनाच्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकर्यांची लूट करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. शेतकरी उत्पादक कंपन्यांना तूर खरेदीची मर्यादा घालून देण्यात आली असली, तरी शेतकर्यांनी तूर विक्रीसाठी आणल्यास सर्व शेतकर्यांची तूर खरेदी केली जाईल. 153 शासकीय तूर खरेदी केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आले होते. खरेदी- विक्री संघ ही शासनाच्या अंतर्गत येणारी संस्था आहे जो खरेदी विक्री संघ शासनाच्या सर्व अटीशर्तींच्या अधीन राहून तूर खरेदी करण्यासाठी सक्षम असेल त्यांचे डी.डी.आर. कडून प्रस्ताव मागवण्यात येतील आणि त्यावर निर्णय घेण्यात येईल असे अब्दुल सत्तार यांनी सांगितले.




