यशाला कोणताही शॉर्टकट नाही : प्रा.नितीन बानगुडे पाटील
बोदवडला योगराज फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
बोदवड : जी माणसे पायाने चालतात ती केवळ अंतर कापतात, मात्र जी डोक्याने चालतात ती यश गाठतात त्यासाठी विद्यार्थ्यांना अनुभव संपन्न करावे, चुकला तर अनुभव येईल व चुकीतून शिकला तर यशस्वी होईल म्हणून निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे मात्र यशाला कुठलाही शॉर्टकट नसतो त्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते, असे मत प्रसिद्ध व्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांनी येथे व्यक्त केले. बोदवड शहरातील मुक्ताई मंगल भवनात शनिवारी सकाळी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
62 विद्यार्थ्यांचा सन्मान
योगराज फाउंडेशन, मुक्ताईनगरद्वारा दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. बोदवड तालुक्यातील 13 हायस्कूलमधील दहावीच्या 38 व बारावीचे 24 अशा एकूण 62 विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा व त्यांच्या परिवाराचा स्मृतीचिन्ह, पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यात आला. व्यासपीठावर सिने अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे, नामदेव सोनवणे, वत्सला सोनवणे, प्रमोद सोनवणे व विनोद सोनवणे आदींची उपस्थिती होती.

कठीण परिस्थितीत मात करता आली पाहिजे
आपल्या व्याख्यानात प्रा.नितीन बानगुडे पाटील पुढे म्हणाले की, यश संपादन करण्यासाठी मेहनत, चिकाटी, जिद्द, सकारात्मक विचार हे गुण संपादन करावे लागतात. स्वकर्तृत्वानेच व्यक्तीमत्व बनते, स्वतःलाच नशीब घडवता येते. ज्याप्रमाणे ओल्या मातीला जसा आकार देवू तशी माती बनते तसेच कोवळ्या वयातच आपन आपल्याला कोणता मार्ग निवडायचा आहे हा निर्णय घेऊ शकतो. जीवनात कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीवर मात करता येथे फक्त ध्येय डोळ्यासमोर पाहिजे. सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सुध्दा आपल्या मनोगतात लक्ष्मीकांत बेर्डे यांनी कठीण परिस्थितीत दिवस काढल्याचे सांगितले शिवाय गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करण्याचा व कार्यक्रम घेण्याचा सुध्दा योग लागतो व तो योग योगराज फाउंडेशनचे संस्थापक विनोद सोनवणे यांनी घडवून खरोखर ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या गुणांना वाव दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध दैनिकात कार्य करणार्या पत्रकारांचाही सन्मान करण्यात आला.




