वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी कार जप्त
पुणे : राज्यात गाजत असलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात पोलिसांनी खेडकर यांची ऑडी कार जप्त केली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी नोटीस बजावताच ही कार बंगल्यातून गायब झाली मात्र ही कार आता बंगल्यातून ताब्यात घेण्यात आली आहे.
कारबाबत पाठवली होती कायदेशीर नोटीस
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन लिहल्यामुळे तसेच लाल दिवा लावल्याने पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता पोलिसांनी ही ऑडी कार खेडकर यांच्या बंगल्यातून जप्त केली. त्यांनी याच ऑडी कारला दिव्यासह महाराष्ट्र शासन बोर्ड लावला होता. याप्रकरणी कारसह कारचे कागदपत्रे तपासणीस हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती. तसेच हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पूजा खेडकर यांनी या ऑडी कारचा दोन दिवसांपूर्वी 27 हजार 600 रुपयांचा दंडही भरला होता.

चालकाने पोलिसांकडे सोपवली ऑडी
विशेष म्हणजे पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार त्यांच्या कारचालकाने अचानक रात्री पुण्यातील चतुःश्रृंगी पोलिसात जमा केली. अनेक सरकारी कार्यालयांत जाताना त्यांनी ही कार वापरली होती मात्र प्रशिक्षणार्थी म्हणून ही कार वापरण्याचा त्यांना अधिकार नसल्याने पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली. दोन दिवसांपूर्वी चौकशीसाठी गेलेल्या पुणे पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी त्यांच्या बंगल्यात प्रवेश दिला नव्हता. मात्र काल रात्री त्यांच्या ड्रायव्हरने गाडी पोलिसांकडे सोपवली आहे. या गाडीची कागदपत्रे पोलिसांकडे सोपविण्यात आलेली नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
