पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये तोतया तिकीट निरीक्षकाला बेड्या
प्रवाशांकडून अवैध वसुली करताना तक्रारीनंतर तिकीट निरीकांनी पकडले
भुसावळ : 12150 पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात स्वतःला तिकीट निरीक्षक म्हणून भासवणार्या भामट्याने प्रवाशांची अचानक तिकीट तपासणी सुरू करीत त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली. काही प्रवाशांनी ही बाब पुणे वाणिज्य कक्षाला कळवल्यानंतर नियंत्रण कक्षाने तातडीने गाडीतील दोघा तिकीट निरीक्षकांना याबाबत खातरजमा करण्याच्या सूचना केल्या व सर्वसाधारण डब्यातून संशयीताला ताब्यात घेण्यात आले व दौंड रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले. सचिन दिवेकर (30, दौंड) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे.
तोतया तिकीट निरीक्षकाकडून तिकीट तपासणी
भुसावळ विभागाचे तिकीट तपासणी कर्मचारी अवधीश कुमार आणि जी.टी. साबरे हे शुक्रवार, 12 जुलै 2024 रोजी ट्रेन 12150 वर कर्तव्यावर असताना भुसावळ-पुणे दरम्यान अहमदनगरमध्ये बनावट तिकीट तपासणी कर्मचारी सर्वसाधारण बोगीतील प्रवाशांकडून अवैधरीत्या पैसे गोळा करीत असल्याची माहिती पुणे वाणिज्य नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर त्यांनी उभय तिकीट कर्मचार्यांना खातरजमा करून कारवाईचे सांगितल्यानंतर सर्वसाधारण डब्यात दोघा तिकीट निरीक्षकांनी तोतया तिकीट निरीक्षकाला ओळख विचारून ओळखपत्र दाखवण्यास सांगितल्यानंतर संबंधित भांबावला व त्याचे बिंग उघडे पडताच त्यास पॅन्ट्री कारमध्ये नेण्यात आले व दौंड आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले. सचिन दिवेकर (30, दौंड) असे अटकेतील संशयीताचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

