प्रति जेजुरी फैजपूरला श्रीराम कथेचा भव्य कलश यात्रेने प्रारंभ
फैजपूर : शहरातील प्रति जेजुरी खंडोबा देवस्थानच्या वतीने श्रीराम कथेनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रा गुरुपौर्णिमेनिमित्त तसेच माजी उपगराध्यक्ष तथा ब्रह्मलीन महंत घनश्याम दासजी ब्राम्हचारी महाराजांच्या सहाव्या पुण्यतिथीनिमित्त संगीतमय श्रीराम कथा खंडोबा देवस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आली. कलश शोभा यात्रेला श्रीराम मंदिरापासून सुरूवात झाली. शहरातील प्रमुख मागनि ही शोभायात्रा मंगल वाद्याच्या मंजुळ ध्वनीत निघाली. गावातील नागरिक व सर्व भाविक-भक्तांनी रिमझिम पावसात मिरवणुकीचे स्वागत केले. श्रीराम मंदिराजवळ शोभायात्रेच्या प्रारंभी महाआरती झाली.
विविध मान्यवरांची उपस्थिती
या महाआरतीत अयोध्या येथील राम कथा व्यक्ता राघवजी महाराज, खंडोबा देवस्थानचे उत्तराधिकारी पवनदासजी महाराज, पूजारी राम मनोहर दासजी महाराज, रामप्रसादासकार महात्यागी, नागा गौरीशंकर दासी, कन्हैया दासजी, कन्हैयादासजी प्रभू, प्रवीण महाराज, नागागौरी शंकरदासजी याच्यासह अनेक संत महंत, आमदार शिरीष चौधरी, युवा नेते धनंजय चौधरी, धीरज अनिल चौधरी, मनीष अनिल चौधरी, मुख्य यजमान दोधू अमृत बोरोले, शशिकला दामू बोरोले व असंख्य भाविक उपस्थित होते.

सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष
कलशयात्रा गावातील श्रीराम मंदिरापासून निघाल्यानंतर पेहेडवाडा चौक, विठ्ठल मंदिर वॉर्ड, न्हावी दरवाजा, रथ गल्ली, होलेवाडा, लक्कडपेठ, मोठा हनुमान मंदिर, सराफ गल्ली, पेहेडवाडा येथून मार्गस्थ होत खंडोबा देवस्थानावर विसर्जीत झाली. कलश यात्रेने फैजपूर नगरी भक्तीमय झाली. देवादिकांच्या घोषणांनी दुमदुमून गेली. या कलश यात्रेचे प्रमुख आकर्षण म्हणजे यात्रेत राम, लक्ष्मण, सीता व राम भक्त हनुमान यांचे सजीव देखावे साकारण्यात आले. फैजपूर व परिसरातील भाविक भक्तांनी सात दिवस चालणार्या संगीतमय श्रीराम कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कथा रोज रात्री 7 ते 10 या वेळात देवस्थानातील महंत घनश्याम दासजी ब्रम्हचारी मंगल कार्यालयात होणार आहे.
