अल्पवयीनांच्या हाती दुचाकी दिल्यास पालकांवरही होणार कारवाई
सहा.निरीक्षक विशाल पाटील ः चिनावल विद्यालयात विद्यार्थ्यांना सुरक्षा सप्ताहाबाबत मार्गदर्शन
चिनावल : अल्पवयीनांच्या हाती दुचाकी दिल्यानंतर काही अपघात घडल्यास पालकांवर गुन्हा दाखल होईल व त्यांना कारागृहात जावे लागेल, असा इशारा सावद्याचे सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांनी येथे दिला. चिनावल गावातील नूतन विद्यालयात इयत्ता अकरावी व बारावी विद्यार्थ्यांना रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाबाबत तसेच डायल 112 व घरफोडी प्रतिबंधा संदर्भात तसेच नवीन कायद्यासंदर्भात सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
नवीन कायद्याची माहिती देताना सहा.निरीक्षक पाटील म्हणाले की, अल्पवयींनाच्या हाती पालकांनी दुचाकी देवू नये तसेच दुचाकी चालवताना अपघात घडल्यास पालकांवर गुन्हा दाखल होवून त्यांना आता थेट तुरूंगात जावे लागेल व दंडात्मक कारवाईदेखील होईल, असे त्यांनी सांगितले. संस्थाध्यक्ष सुनील महाजन, चेअरमन विनायक महाजन, शालेय समिती सदस्य अनिल किरंगे, प्राचार्य एच.आर.ठाकरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमास शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

