माजी मंत्री अनिल देशमुखांनी जळगावच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना धमकावले

जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांचा सीबीआय जवाबात दावा


मुंबई : मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दबाव आणला होता, असा आरोप प्रवीण मुंढे यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात केला आहे. जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी सीबीआयला याबाबत जवाब दिल्याचे वृत्त ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने दिले आहे.

महाजनांना अडकवण्यासाठी रचला कट
अनिल देशमुख यांनी जवळपास चार ते पाच वेळा तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांना फोन केले होते तसेच धमकीची सुद्धा भाषा वापरली होती. त्यांनी जबरदस्तीने गिरीश महाजन यांना या गुन्ह्यात कशाप्रकारे अडकवण्यात येईल, यासाठी कट रचला होता, अशा प्रकारचा अहवाल सीबीआयने कोर्टात दाखल केला आहे. यामध्ये अनिल देशमुख यांनी सिस्टीमवर दबाव टाकला होता. तसेच देशमुख हे प्रवीण चव्हाण यांना एसपीकडे पाठवत होते, असं सीबीआयने म्हटलं आहे.


अनिल देशमुखांनी केले फोन
जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, गिरीश महाजन यांच्याविरोधात विजय भास्करराव पाटील यांनी तक्रार दिली होती. तक्रारदार येण्यापूर्वीच मला अनिल देशमुख यांचा फोन आला. विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण तुमच्याकडे येऊन माहिती देतील, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते. त्यानंतर प्रवीण चव्हाण आले आणि त्यांनी तक्रारीबाबत सांगितले आणि सांगितले की, अनिल देशमुख यांचा एफआयआर दाखल करण्याचा आदेश आहे. मी त्यांना पुणे शहर पोलिसांकडे जाण्यास सांगितले कारण तो सांगत असलेली घटना जळगावच्या हद्दीतील नव्हती. मात्र, तक्रारदाराने तसे करण्यास नकार दिला.

सततच्या धमक्यांमुळे अखेर दाखल केला गुन्हा
आठवडाभरानंतर अनिल देशमुख यांनी पुन्हा फोन केला. त्यांनी पुन्हा तक्रारदाराला पाठवण्यास सांगितले. मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. तक्रारदाराच्या सततच्या प्रयत्नांमुळे आणि गृहमंत्र्यांच्या थेट फोन फोनमुळे मी संपूर्ण घटना नाशिक आयजी कायदा व सुव्यवस्था आणि एडीजी कायदा व सुव्यवस्था यांना कळवली.

मुंढे यांनी पुढे म्हटले की, एका आठवड्यानंतर अनिल देशमुख यांनी पुन्हा फोन केला. यावेळी त्याने मला धमकावले आणि एफआयआरसाठी मला तीनदा फोन का करावा लागला, अशी विचारणा केली. गृहमंत्र्यांच्या सततच्या धमक्यांमुळे अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोणतीही घाई नसतानाही अनिल देशमुख यांच्या दबावाखाली शून्य एफआयआर नोंदवण्यात आल्याचेही मुंढे यांनी म्हटले आहे. आता आरोपामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !