विजेच्या धक्क्याने धानवडच्या शेतकर्याचा मृत्यू
जळगाव : जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकर्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. शेतात साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी मोटार लावत असतांना शेतकरी संजय बापू पाटील (42) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारातील त्यांच्या शेतात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
असे आहे प्रकरण
जळगाव तालुक्यातील धानवड येथील शेतकरी संजय पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते. त्यांचे उमाळा शिवारात शेत असून त्यांच्या शेतात पावसाचे पाणी साचले होते. शुक्रवार, 2 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता संजय पाटील हे पत्नी, वहिनी व पुतणीसह शेतात साचलेले पाणी काढण्यासाठी गेले होते. शेतातील विहरीजवळ लावलेली मोटार सुरू करण्यासाठी संजय पाटील हे त्याठिकाणी गेले असता, त्यांना विजेचा जोरदार शॉक लागून ते शेतात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तातडीने नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
