यावल पोलीस ठाण्यातील बेवारस 25 दुचाकी मालकांना दुचाकी नेण्याची पोलिसांचे आवाहन
यावल (18 ऑगस्ट 2024) : यावल पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात, अपघातात व बेवारस स्थितीत मिळून आलेल्या तब्बल 25 दुचाकी आहेत. या सर्व 25 दुचाकी गेल्या 10 ते 15 वर्षापासून पोलीस ठाण्यात पडून आहेत. पोलिसांनी या दुचाकींच्या विल्हेवाट संदर्भात कार्यवाही सुरू केली आहे. दुचाकींच्या मालक व त्याच्या वारसदारांनी आवश्यक कागदपत्र पोलीस ठाण्यात सादर करून आठ दिवसाच्या आत दुचाकी आपापल्या ताब्यात घ्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तर बेवारस समजून दुचाकींचा होणार लिलाव
यावल पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यात, अपघातात व बेवारस स्थितीत मोठ्या प्रमाणावर वाहन मिळून आले आहे. त्यातील गेल्या 10 ते 15 वर्षांपासून 25 दुचाकी बेवारस स्वरूपात पडून आहेत. या दुचाकींची विल्हेवाट आता पोलिसांच्या वतीने लावण्याची तयारी केली जात आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर व हवालदार शांताराम तळेले यांच्या वतीने बेवारस दुचाकी मालकांना सूचना जाहीर करण्यात आली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, सदर अपघातात किंवा इतर कारणाने पोलीस स्टेशनमध्ये पडलेल्या या दुचाकीच्या मालक आणि वारसदारांनी येथे येवून पाहणी करीत ज्यांची दुचाकी असेल त्यांनी त्याचे कागदपत्र सादर करून त्या दुचाकी घेऊन जाव्यात. येत्या आठ दिवसाच्या आत जर कोणी दुचाकी घेऊन गेले नाही तर या संपुर्ण दुचाकी बेवारस समजून शासकीय नियमानुसार त्यांची विल्हेवाट लावली जाईल, असे पोलिसांनी सुचित केले आहे.

