भुसावळात अवघ्या अडीच तासात सर्व रानभाज्यांची विक्री
रानभाजी महोत्सवास भुसावळकरांचा उदंड प्रतिसाद
भुसावळ (20 ऑगस्ट 2024) : शहरातील म्युन्सिपल हायस्कूलच्या प्रांगणात महाराष्ट्र कृषी विभाग, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी, इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ, रेलसीटी व आयुर्वेद व्यासपीठ यांच्या तर्फे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. विविध प्रकारच्या दुर्मीळ रानभाज्या खरेदीचा ग्राहकांनी आनंद लुटला. उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्याहस्ते झाले. यावेळी बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सरकारी वकील अॅड.नितीन खरे, तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अवघ्या अडीच तासांत ग्राहकांनी विविध रानभाज्यांची खरेदी केली.
राजभाज्यांनी वेधले लक्ष
कटूर्ली, अळंबी, आघाडा, अमरकंद, आचकंद, कोवळेबांबू, बांबूचे कोंब, महाळुंग, रानकेळी, रानतोंडले, रानपुदाना, राक्षस, कुसरा, कुई, भुईपालक, घोळ, तरोटा ,कुरडू, गुळवेल, अंबाडी भाजी भाकरी, कासली, फांग, अरवी, तांदुळकुंद्रा, काळा म्हैसवेल, चवळीच्या डेर्या, चिवळ, सराटा, बडकी, लोधी, वागोटी, हळंदा, आळूचे पान, समिंद शोक पानं असे विविध प्रकारच्या विविध रानभाज्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधले. सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन वरदान ठरेल व विविध आजारांवर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळेल, असे आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव म्हणाले. रोटरी रेल सिटीचे सचिव अनिल सहानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सुयश न्याती यांनी सूत्रसंचलन तर प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले.

यशस्वीतेसाठी रोटरी रेल सिटीचे अध्यक्ष विशाल शाह, सचिव अनिल सहानी, प्रकल्प प्रमुख श्रीकांत जोशी, सह प्रकल्प प्रमुख हरमीतसिंग माखन, इनरव्हील रेल सिटीच्या अध्यक्षा मीनाक्षी धांडे, सचिव किरण जावळे, आयुर्वेद व्यासपीठाचे अध्यक्ष डॉ.राहुल पांडे, आत्माचे तंत्र व्यवस्थापक प्रमोद जाधव आदींनी परिश्रम घेतले.
