राज्याची पोलीस यंत्रणा कुचकामी असल्यानेच शरद पवारांना सीआरपीएफ सुरक्षा : खासदार संजय राऊत
CRPF security for Sharad Pawar only because the police system of the state is ineffective: MP Sanjay Raut जळगाव (23 ऑगस्ट 2024) : राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांना केंद्राने सीआरपीएफ सुरक्षा प्रदान केल्यानंतर या संदर्भात ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य जळगाव दौर्यात केले आहे. शरद पवार यांना केंद्राची सुरक्षा दिली तिची गरज नाही. याचा अर्थ असा आहे की गृहमंत्र्यांना राज्यातील पोलिसांवर विश्वास नाही. एकनाथ शिंदे यांना फार गांभीर्याने घेऊ नका, त्यांना दोन महिने सहन करा, असेही ते म्हणाले आहेत.
राज्याचे यंत्रणा कुचकामी, केंद्राने उमटवली मोहोर
खासदार संजय राऊत म्हणाले की, राज्यातील पोलिस जसे मुली बाळींचे संरक्षण करू शकत नाही तसेच ते मोठ्या राजकीय नेत्यांची सुरक्षा करू शकत नाही, यावर केंद्र सरकारने मोहर उमटवली आहे. तुमचे पोलिस, यंत्रणा कुचकामी आहेत यावर केंद्राने मोहर उमटवली आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

मग यांच्याकडून काय अपेक्षा करणार !
संजय राऊत म्हणाले की, पोलिस महासंचालिका या महिला आहेत, त्या जाहीर पणे सांगतात की मी संघाची कार्यकर्ती आहे, मग काय अपेक्षा करणार असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. पोलिसांना संघ परिवाराशी जवळीक पाहून मोठी पदे देण्यात आली आहेत, असेही राऊत यांनी म्हटले आहे.




