सकारात्मक विचारांचा प्रसार गरजेचा : ह.भ.प. शिरीष महाराज
यावल (23 ऑगस्ट 2024) : सध्याची पिढी ही नकारात्मक विचारांनी प्रेरीत झाली असून संतांचे विचार, बोध व संस्काराच्या शिकवणीतून सकारात्मक विचारांचा प्रसार अशा कार्यक्रमातून होत असतो. अशा कार्यक्रमांच्या आयोजनासह श्रवणाचा लाभ तरुणांनी घ्याव, असे आवाहन संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज यांनी शहरात व्यक्त केले. यावल शहरातील श्री महर्षी व्यास मंदिर सभागृहात संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज यांचे जाहीर व्याख्यान बुधवारी सायंकाळी झाले. महाराजांनी समाजप्रबोधन आणि अध्यात्मिक जागृती या मुद्यांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यांची विचार मंचावर उपस्थिती
शहरातील श्री महर्षी व्यासमंदिराच्या सभागृहात यावलच्या आश्रय फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुंदन सुधाकर फेगडे यांच्या पुढाकाराने बुधवारी सांयकाळी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. वक्ताश्री म्हणून संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज ह.भ.प.शिरीष महाराज यांची उपस्थिती होती. प्रसंगी कार्यक्रमात विजय महाराज, संचित महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, हेमराज फेगडे, संजय फिरके सह यावल परिसरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमास तालुक्यातून मोठ्या संख्येत भाविक, भक्त तथा संत, साहित्याच्या प्रेमींची मोठी उपस्थिती होती. शिरीष महाराजांनी आपल्या प्रवचनांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा आणि अध्यात्मिक वारशाचा मोलाचा संदेश दिला. समाजप्रबोधन आणि अध्यात्मिक जागृती या मुद्यांवर त्यांनी विशेष भर दिला. डॉ.जागृती फेगडे, प्राची पाठक, भूषण फेगडे, रितेश बारी, उज्वल कानडे आदींनी परिश्रम घेतले.

