नेपाळ बस अपघात : मुंबईत हलविलेल्या सातपैकी तीन रुग्णांवर आज होणार शस्त्रकिया
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विचारपूस
Nepal bus accident: Three out of seven patients shifted to Mumbai will undergo surgery today भुसावळ (28 ऑगस्ट 2024) : नेपाळमधील पोखरा काठमांडू दरम्यान झालेल्या भीषण अपघातातील 16 जखमींवर काठमांडू येथील हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. यातील सात जखमींना उपचारानंतर सोमवारी हॉस्पीटल प्रशासनाने डिस्जार्ज दिल्यानंतर मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये हलविण्यात आले. दरम्यान या जखमींची मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप पदाधिकार्यांनी भेट घेवून विचारपूस केली. सात जखमींपैकी तिघांवर बुधवारी शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
सात जखमींवर मुंबईत उपचार
नेपाळ येथे झालेल्या दुर्दैवी बस अपघातातील सात जखमींना बॉम्बे हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी या जखमींची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन विचारपूस केली. त्यांच्यासोबत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते. या सात जखमींपैकी कुमुदिनी झांबरे, वर्षा भंगाळे, निलीमा भिरुड आदींचा हात फॅक्चर असल्याने तिघांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी या सदिच्छा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, गोलू पाटील, केदार ओक आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

आज पुन्हा चार रुग्ण मुंबईत येणार
नेपाळ दुर्घटनेतील 16 जखमींपैकी 9 जखमी अद्यापही काठमांडू येथे उपचार घेत आहेत. त्यातील आणखी चार जखमींना बुधवारीमुंबईत आणण्यात येणार असून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. राज्य सरकारतर्फे या सर्व जखमींना सर्वेतोपरी मदत करण्यात येत असून, विधी व न्याय विभागांतर्गत असलेल्या वैद्यकीय सहायता कक्षामार्फत यासाठी संपूर्ण समन्वय ठेवला जात आहे, अशी माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर दिली आहे.




