भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाची मोठी कारवाई : अप गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये 40 हजारांचा बेवारस गांजा जप्त
तस्करी पुन्हा ऐरणीवर : डॉग स्कॉड पथकाला गाडी तपासणीदरम्यान आढळली संशयास्पद बॅग
भुसावळ (30 ऑगस्ट 2024) : दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्थानकाच्या दर्शनी भागात एक लाख 70 हजारांचा गांजा जप्त केल्याची घटना ताजी असताना अप गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये तपासणीदरम्यान एका जनरल बोगीतील बॅगेत बेवारसरीत्या 40 हजार रुपये किंमतीचा चार किलो गांजा आढळल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ सुरक्षा बलाच्या डॉग स्कॉडमधील ‘वीरू’ नामक श्वानाने बेवारस बॅगेतून गांजा शोधला मात्र संशयीत समोर न आल्याने बेवारस समजून बॅग जप्त करण्यात आली. सततच्या घटनांमुळे गांजा तस्करी ऐरणीवर आली आहे.
बेवारस बॅगेतून गांजा जप्त
सूत्रांच्या माहितीनुसार, अप गांधीधाम एक्स्प्रेस अकोल्याहून अहमदाबादकडे शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी निघाल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर.के.सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉग स्कॉड पथकाचे हॅण्डलर हवालदार जितेंद्र इंगळे व हवालदार दीपक पाटील हे अकोला रेल्वे स्थानकापासून गाडीत चढले. याप्रसंगी गार्ड पासूनच्या जनरल (सर्वसाधारण) डब्यांची तपासणी सुरू असताना मलकापूर-बोदवड दरम्यान गाडी आली असता तिसर्या क्रमांकाच्या जनरल बोगीत प्रवाशांच्या शीटखाली असलेल्या एका बॅगेत संशयास्पद वस्तू असल्याचा सिग्नल ‘वीरू’ नामक श्वानाने हॅण्डलरला दिला. कर्मचार्यांनी ही बाब आपल्या वरिष्ठांना कळवल्यानंतर भुसावळ आल्यानंतर सतर्कता बाळगत बॅग उघडली असता त्यात सुमारे चार किलो गांजा आढळला तर प्रवाशांनी मात्र बॅग आपली नसल्याचे म्हणत कानावर हात ठेवले. रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक पी.आर.मीना व सहकार्यांनी तातडीने धाव घेत बॅगेची पाहणी केली.

चार किलो गांजा जप्त
भुसावळात शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच सुमारास गांधीधाम एक्स्प्रेस आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाने अत्यंत काळजीपूर्वक बॅग उघडली असता त्यात तीन किलो 900 ग्रॅम वजनाचा गांजा आढळल्याने तो जप्त करण्यात आला. सायंकाळी उशिरा लोहमार्ग पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास लोहमार्गचे पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किसन राख करीत आहेत.
सीसीटीव्ही फुटेज तपासणार : गस्त वाढवणार
लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर धायरकर म्हणाले की, बेवारसरित्या गांजाची बॅग सापडल्याने आता एक्स्प्रेस निघाल्याच्या मूळ ठिकाणापासून संशयास्पद बॅग कुणी व कोणत्या स्थानकावरून ठेवली याबाबत तपास केला जाईल शिवाय अप्रिय घटना रोखण्यासाठी गस्त अधिक वाढवण्यात आली आहे. प्रवाशांनी संशयास्पद वस्तू वा बॅग आढळल्यास सुरक्षा यंत्रणांशी संपर्क साधावा.
