लघू पाटबंधारे उपविभागीय कार्यालय भुसावळातून स्थलांतरणाचा घाट

रावेर, मुक्ताईनगर, भुसावळ तालुक्यातील शेतकर्‍यांची होणार गैरसोय


भुसावळ (1 सप्टेंबर 2024)  लघू पाटबंधारे बांधकाम उपविभाग, भुसावळ या विभागीय कार्यालयाचे भुसावळातून जळगाव येथे स्थलांतरण करण्याचा घाट घातला गेला आहे. या कार्यालयात भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे, खिर्डी, खडका, साकरी. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी, ढोरमाळ तर रावेर तालीुक्यातील मात्रणनाला, निंबादेवी, जिनसी, गंगापूरी धरण क्षेत्रातील गावे समाविष्ठ आहेत. लाभ व बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना याच कार्यालयातून दाखले व कागदपत्रे, गाळ काढण्याच्या परवानगी मिळतात, हे कार्यालय स्थलांतरीत होणार असल्याने या शेतकर्‍यांना भुसावळ ऐवजी जळगावला पायपीट करावी लागणार आहे.

निर्णयाला शेतकर्‍यांचा विरोध
उपविभागीय अधिकारी, लघू पाटबंधारे बांधकाम उपविभाग हे कार्यालय अनेक वर्षांपासून भुसावळात आहे. भुसावळ, रावेर व मुक्ताईनगर या तालुक्यातील लाभ व बुडीत क्षेत्रातील शेतकर्‍यांना भुसावळात येवून लघू पाटबंधारे तलावातील मत्सपालन, तलावातील गाळ काढणे व शेतीस पुरवण्यासाठी परवानगी, विविध दाखले व उतारे घेण्यासाठी यावे लागते. या तालुक्यांच्या मध्यवर्ती भागात असलेले हे कार्यालय सर्वांना सोयीचे आहे. मात्र हे कार्यालय जळगाव येथे हलविण्याचे आदेश अधिक्षक अभियंता, जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाने दिले आहेत. या निर्णयाला शेतकर्‍यांनी विरोध दर्शवला आहे.

दोन वर्षांपूर्वीही झाला होता प्रयत्न
लघू पाटबंधारे उपविभागाचे भुसावळातील कार्यालय दोन वर्षांपूर्वीही असाच घाट घालून जळगाव येथे हलविले जात होते. यावेळी शेतकर्‍यांनी खासदार रक्षा खडसे यांना निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार हे कार्यालय भुसावळात राहिले, आता पून्हा काही अधिकारी कर्मचारी कमी असल्याचे सांगून हे कार्यालय हलविण्याच्या मार्गावर आहे. यामुळे शेतकर्‍यांना मात्र त्रास होणार आहे.

परिपत्रकाला दाखवली केराची टोपली
लघू पाटबंधारे बांधकाम उपविभागाचे कार्यालय भुसावळ येथे असणे शेतकर्‍यांच्या दृष्टीने हिताचे आहे. मात्र अधिकारी नाहक शेतकर्‍यांना गैरसोय होण्यासारखी कृती करीत आहेत. जलसंपदा विभागाच्या 7 मे 2021 च्या परिपत्रकानुसार कार्यालयाचे स्थलांतरण, फेररचना करता येत नाही. पण या नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे भाजपा पदाधिकारी मंगेश पाटील यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !