आंतरराष्ट्रीय मॅक फेअरमध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांची निवड
वरणगाव (2 सप्टेंबर 2024) : दोन वर्षांपूर्वी गुजरातमधील जुनागड येथे झालेल्या राष्ट्रीय भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवलमध्ये भुसावळ तालुक्यातील चौघांनी सहभाग घेतला. या ठिकाणी केलेल्या सादरीकरणामुळे त्यांची लखनऊ येथे होणार्या आंतरराष्ट्रीय मॅक फेअर 2024 साठी निवड करण्यात आली.
आठ विद्यार्थ्यांची निवड
दोन वर्षांपूर्वी गुजरात राज्यात रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने भारतीय सायन्स टेक्नो फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सायंटिस्ट कॅरेक्टर प्ले रोल व सायन्स क्विझ या स्पर्धेत यश मिळवले. रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संघात भुसावळ तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालयातील मनीष माळी, तोषल तेली, शिक्षक सुनील वानखेडे तसेच भुसावळ शहरातील सेंट अॅलॉयसीस हायस्कूलमधील पार्थ वानखेडे यांची निवड करण्यात आली. 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान लखनऊमधील सिटी मॉन्टेसरी स्कूलमध्ये हा कार्यक्रमह ोणार आहे. निवड करण्यात आलेल्या संघात राजस्थानचे चार, मध्य प्रदेशातील एक व महाराष्ट्रातील तीन अशा 8 विद्यार्थ्यांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली.

या स्पर्धेत विविध देशातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या ठिकाणी सायन्स ड्रामा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स शाप की वरदान यावर वादविवाद, सायन्स ग्रुप डिस्कशन, सायंटिस्ट कॅरेक्टर स्पीच, डिस्कवरी ऑफ सायन्स ओलंपियाड, सायन्स मॉडेल डिस्प्ले, मॅथ रोबो रेस, वाईल्ड लाईफ कंजर्वेशन यावर प्रोजेक्ट यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भुसावळ तालुक्यातील तिघे विद्यार्थी व एक शिक्षक सहभागी होणार आहे. या निवडीबद्दल शालेय समितीचे चेअरमन चंद्रकांत बढे, दि वरणगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वंदना पाटील, उपाध्यक्ष ज्ञानदेव झोपे, सचिव चंद्रशेखर झोपे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक वंदना चव्हाण आदींनी कौतुक केले आहे.
